

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या दूधनाका येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेतलेल्या मरियम टॉवर या इमारतीवर तीन वाढीव बेकायदा मजले बांधणार्या दोन विकासकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केडीएमसीच्या क प्रभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलमान्वये बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीला अनुसरून पोलिसांनी दोन्ही विकासकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
क प्रभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी दूधनाका भागात राहणारे मोहम्मद एच. फरीद आणि अफजल बेग या दोन विकासकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी बैलबाजार भागात एका जकात माफिया म्हणून ओळखल्या जाणार्या भूमाफियाने केडीएमसीच्या उद्यान/बगिच्यासाठी आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारती उभारून या इमारतीमधील सदनिका नागरिकांना दस्त नोंदणी पध्दतीने विक्री केल्या होत्या.
याप्रकरणी केडीएमसीतील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाजारपेठ पोलिसांकडून हा तपास काढून घेऊन तपासासाठी ठाण्यातील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या बेकायदा इमारतीत काही वादग्रस्त अधिकार्यांची गुंतवणूक असल्याची केडीएमसीत चर्चा आहे.
बैलबाजार भागातील या बेकायदा इमारतीचे प्रकरण ताजे असतानाच, आता दूधनाका भागातील दोन विकासकांनी केडीएमसीच्या नगररचना विभागाने दिलेल्या बांधकाम मंजुरीपेक्षा मरियम टॉवर या इमारीवर वाढीव तीन बेकायदा मजले बांधून इमारत बांधकाम नियमाचा भंग केला आहे. या वाढीव बेकायदा मजल्यांंबाबत केडीएमसीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर क प्रभागाच्या अधिकार्यांनी या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना बांधकाम मंजुरीपेक्षा तीन माळे वाढीव बांधले असल्याचे आढळून आले. या संदर्भात केडीएमसीने संबंधित विकासकाला सदर तिन्ही मजले काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
मरियम टॉवर इमारतीमधील वाढीव बेकायदा बांधकामांंवर केडीएमसी कारवाई कधी करते ? याकडे तक्रारदारासह रहिवाशांच्या नजरा लागल्या आहेत. अधिकृत इमारतींवरील वाढीव बेकायदा मजला प्रकरणी विकासकांवर गुन्हे दाखल केले की त्यानंतर महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे निर्ढावलेल्या विकासकांना अशाप्रकारचे वाढीव बेकायदा मजले वाढविण्याचे बळ मिळते, असे तक्रारदारांनी सांगितले.
यासंदर्भात नोटिसा देऊनही विकासक मोहम्मद फरीद आणि अफजल बेग वाढीव बेकायदा बांधकामे काढले नसल्याने केडीएमसी प्रशासनाने या दोन्ही विकासकांविरुध्द एमआरटीपी अर्थात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशांनुसार अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे यांनी या दोन्ही विकासकांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
गेल्या आठवड्यात आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी गोळवली येथील एका बेकायदा बांधकामावर तोडकामाची कारवाई कारवाईत अडथळे आणणार्या 10 रहिवाशांंच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पश्चीम डोंबिवलीच्या ह प्रभाग क्षेत्र हद्दीत खाडी किनारपट्टीत बेसुमार बेकायदा चाळी उभारणीची कामे भूमाफियांकडून सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.