

ठाणे : कोरोनाच्या काळात आमचा व्यवसाय बंद पडला होता. पण, नव्या कर्जामुळे मी पुन्हा शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला. आता माझ्या दुकानात तीन मुली काम करतात, अशी आपल्या जिद्दीची कहाणी सांगणाऱ्या महिला आता ठाणे जिल्ह्यात उभारी घेत आहेत.
चूल आणि मूल यामध्ये अडकलेली स्त्री आर्थिक सक्षमीकरणासाठी आता पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र ठाणे जिल्ह्यात पुढे येऊ लागले आहे. गृहोपयोगी साहित्याचे उद्योग सुरू करून ३ हजार ३७० महिला बचत गटांनी १९१ कोटींचे कर्ज घेऊन या उद्योगांचा पाया रचला आहे. यामुळे कित्येक झोपड्यांतून, छोट्या घरांतून आणि अडचणींमध्येही जिद्दीने उभ्या राहिलेल्या महिलांना पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेची संधी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या १० हजार ९९७ महिला बचत गट कार्यरत असून एक लाखापेक्षा अधिक महिला या गटांशी जोडल्या गेल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि 'उमेद' यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ठाणे जिल्ह्यात बचत गटाच्या महिलांना १९१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. या महिलांनी हे कर्ज फक्त घेतले नाही, तर मेहनतीने परतफेड करत स्वतःचा व्यवसायही उभा केला आहे. त्यामुळे या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही भक्कम आधार निर्माण झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, कोरोनामुळे अडथळा आलेल्या उद्योगांना या नव्या आर्थिक मदतीने पुनरुज्जीवन मिळाले आहे. २०२२-२३ या वर्षातही २,६१३ बचत गटांना सुमारे ७५.५७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले होते. याच यशस्वी पद्धतीची पुनरावृत्ती करत जिल्हा प्रशासनाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ठोस पावले उचलली आहेत.
ही केवळ कर्जपुरवठ्याची योजना नाही, ही स्त्रीशक्तीला दिलेली नवी ओळख आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया आता आर्थिकदृष्ट्या इतक्या सक्षम झाल्या आहेत की, त्या इतर महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योजिका बनल्या आहेत. ठाणे जिल्हा हा यशस्वी महिला बचत गटांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.
छायादेवी शिसोदे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
'उमेद अभियान' अंतर्गत सुरू असलेल्या या योजनेतून महिलांना लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय, खाद्यपदार्थ निर्मिती, मसाले, लोणची, पापड तयार करणे, खानावळ आणि दुग्धव्यवसाय यासाठी मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य दिले जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ हजार ३७० महिला बचत गटांना विविध उद्योग उभारणीसाठी गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १९१ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तर २१ कोटी ९४ लाख रुपयांचा खेळता भांडवल निधी उपलब्ध करून दिला आहे. तर २२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील २,६१३ बचत गटांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७५ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले होते.