

सापाड (ठाणे) : मध्य रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये पुन्हा एकदा वादग्रस्त प्रकार घडला असून महिलांमधील तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी विरार लोकलमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा अशाच स्वरूपाचा प्रकार समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये महिला एकमेकींच्या झिंज्या ओढताना, एकमेकांवर ओरडताना, हातघाईवर येताना दिसत आहेत. डब्यातील इतर महिलाही त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण हाणामारी काही काळ सुरूच राहिली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना डोंबिवली स्थानकावरून सकाळी साडेआठला निघालेल्या सीएसएमटी लोकलमध्ये घडली. हा डबा महिला प्रवाशांसाठी राखीव होता. चढण्याच्या-उतरण्याच्या वादातून ही धक्कादायक हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी या यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. हाणामारी करणाऱ्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. व्हिडीओमधील महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी झगडा, गैरव्यवहार व अन्य कायदेशीर कलम अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा हाणामारीचा प्रकार आजचा नसून दररोज सकाळच्या वेळेस मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये असे अनेक प्रकार घडत आहेत.
दररोज लोकलमध्ये हीच परिस्थिती असते. महिला डब्यात कुठल्याही कारणावरून वाद होतो आणि तो मारामारीपर्यंत जातो. या प्रकारांमुळे मध्य रेल्वेच्या महिलांसाठी राखीव डब्यांतील सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतोय. त्यामुळे प्रशासनाने सकाळच्या गर्दीच्या वेळेस अतिरिक्त सुरक्षा देणं गरजेचं असल्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. रेल्वे प्रशासनाकडून महिलांना आवाहन करण्यात आलं आहे की, अशा घटना घडल्यास तात्काळ आरपीएफ हेल्पलाइन १८२ वर संपर्क साधावा किंवा नजीकच्या पोलिसांना माहिती द्यावी.