

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या २५ वर्षीय विवाहित मुलीची तिच्या पित्यानेच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची घटना 'रचना रॉयल' इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, हत्येनंतर आरोपी पिता फरार झाला आहे.
मृत गायत्री शिंदे (२५) हिचे नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न झाले होते. ती काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. रविवारी (दि. २४) हे कुटुंब एकत्र चित्रपट पाहून आले होते, तर सोमवारी (दि. २५) गायत्री आणि तिचे वडील विनोद वसईकर घरी होते. सोमवारी रात्री गायत्रीची आई कामावरून घरी परतली असता, घराचे दार उघडे होते आणि आत गायत्रीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे पाहून आईला मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात गायत्रीच्या कपाळावर टोकदार हत्याराने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी विनोद वसईकर हा सोमवारी सकाळी कामावर गेल्याचे नाटक करून पुन्हा घरी परतल्याचे आणि दुपारी ४ वाजता घाईघाईने घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या सीसीटीव्ही पुराव्यामुळे पित्यावरच खुनाचा संशय बळावला आहे.
गायत्रीचे पती अक्षय शिंदे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती की अन्य काही कारण? याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या आरोपी विनोद वसईकरचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी तीन विशेष पथके तैनात केली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.
या प्रकरणी सखोल तपास सुरू असून, आरोपीला लवकरच जेरबंद केले जाईल. नातेवाईक आणि नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.