

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील महापोली परिसरात उत्तर प्रदेश पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून बनावट वाम जिरा कोल्ड्रिंक फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात पोलिसांनी बनावट कोल्ड्रिंकच्या 1.50 लाख बाटल्या, मशिनरी, बनावट लेबल आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
यासोबतच पोलिसांनी फॅक्टरी सील केली असून, मालकावर कॉपीराइटसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात हनी जी फूडीज झोन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे, जी वाम जिरा नावाचे लोकप्रिय पेय उत्पादन करते. काही दुकानांमध्ये या उत्पादनांची नक्कल करून बनावट वाम जिरा विक्री केले जात होते.
याबाबत कंपनी मालक अश्विनी जैन यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात तक्रार दाखल केली होती. पोलिस तपासात ही बनावट उत्पादने महाराष्ट्रातील भिवंडीतील महापोली परिसरात शफाहत लियाकत खान यांच्या जफरान एंटरप्रायझेस नावाच्या फॅक्टरीमध्ये तयार केली जात असल्याचे उघड झाले.
संपूर्ण फॅक्टरी केली सील
कंपनीच्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश पोलिसांनी भिवंडी पोलिसांच्या मदतीने महापोलीतील जफरान एंटरप्रायझेस या फॅक्टरीवर छापा टाकला. त्यावेळी फॅक्टरीमध्ये बनावट ‘एम जिरा’ कोल्ड्रिंकचे उत्पादन सुरू होते. पोलिसांनी तात्काळ हे उत्पादन थांबवले आणि दीड लाखाहून अधिक बनावट बाटल्या, बनावट लेबल, कच्चा माल, मिक्सिंग आणि पॅकेजिंग मशीन जप्त केल्या. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण फॅक्टरी सील केली.
या प्रकरणी, बेकायदेशीर फॅक्टरीचा मालक शफाहत लियाकत खान याच्या विरोधात कॉपीराइट कायदा 1957 आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.