

मिरा रोड : बनावट फोन पे पचा वापर करून लोकांची फसवणुक करणार्या आरोपीला काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील शॉप नं.04 सिल्वर केसिया बिल्डींग, प्लेझंट पार्क येथे खुशाल दिलीप सोनार (22) यांचे बॅटरीचे दुकान आहे.
7 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास खुशाल हे दुकानात असताना अनोळखी आरोपीने त्यांच्या दुकानात येवून चारचाकी वाहनाची बॅटरी खरेदी केली. बॅटरी खरेदी करण्यासाठी 17,300 रुपये बनावट फोन पे द्वारे फिर्यादीला पाठविल्याचा त्याच्या मोबाईल मधील स्क्रिनशॉट, मेसेज दाखवुन बॅटरी घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यावर पैसे आले नसल्याने त्यांची फसवणुक केल्या बाबत काशिमिरा पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत 10 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हयाचे घटनास्थळ व त्याच्या आजुबाजूचे तसेच इतर परिसरात तपास करुन नमुद गुन्हा हा आरोपी वलय कल्पीतकुमार सोलंकी (26) धंदा-कार खरेदी विक्री रा. कमला पार्क, सुरभी पार्क 2 समोर, पो. माजलपुर, जि-वडोदरा, गुजरात याने केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला बोरीवली, मुंबई येथे त्याने गुन्हयात वापरलेल्या मोटार कार सह ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करून त्याने फिर्यादी यांची फसवणुक करून नेलेली 17,300 रुपये किंमतीची मोटर कारला वापरण्यात येणारी बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि योगेश काळे हे करत आहेत. गुन्हयातील अटक आरोपीचा गुन्हे अभिलेख पडताळला असता त्याच्या विरूध्द माजलपुर पो ठाणे, वडोदरा येथे गुन्हा दाखल आहे.