

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या एका खासगी रूग्णालयाच्या चालक आणि अन्य दोन जणांनी संगनमत करून १३ रूग्णांच्या शस्त्रक्रियांसह औषधोपचाराची बनावट कागदपत्रे तयार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४ लाख ७५ हजार रूपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासातून हा सारा प्रकार उजेडात आला. २६ मे ते १० जुलै २०२३ या कालावधीत मुख्यमंत्री साहय्यता निधीतून निधी लाटण्याचा प्रकार घडला आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे सहाय्यक संचालक देवानंद सखाराम धनावडे (५०) यांनी या फसवणूकी प्रकरणी गुरूवारी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यता निधी कक्षाच्या छाननीत हा निधी उकळण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रशासनाकडून ठाण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची सविस्तर चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणात प्रथमदर्शनी चौकशी पथकाला तथ्य आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय सहाय्यता निधी कक्षाने घेतला. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सहाय्यक संचालक देवानंद धनावडे यांचा अहवाल खडकपाडा पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी या फसवणूकी प्रकरणी रूग्णालय चालक आणि अन्य दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खडकपाडा पोलिस ठाण्यात धनावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आंबिवली मोहने पूर्वेतील शिव निर्मल हाईट्समधील पहिल्या माळ्यावरील गणपती मल्टी स्पेशालिटीचे रूग्णालयाचे डॉ. अनुदुर्ग ढोणी (४५, रा. आंबिवली), प्रदीप बापू पाटील (४१, रा. ओम गिरीधर, गौरीपाडा, कल्याण-पश्चिम) आणि ईश्वर पवार (रा. धुळे) या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक संचालक धनावडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की डॉ. अनुदुर्ग ढोणी यांचे आंबिवली पूर्व येथे गणपती मल्टिस्पेशालिटी रुग्णालय आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे दाखल प्रस्तावामध्ये आंबिवली पूर्वेतील गणपती मल्टी स्पेशालिटी रूग्णालयामध्ये १३ रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर या रूग्णालयात शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्यात आले आहेत, अशी बनावट कागदपत्रे गुन्हा दाखल केलेल्या तीनही व्यक्तींनी तयार केल्याची तक्रार आहे. ही कागदपत्रे खरी आहेत, असा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे सादर केला.
हा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने डॉ. ढोणी यांच्या गणपती मल्टी स्पेशालिटी रूग्णालयाच्या बँक खात्यावर १३ रूग्णांच्या उपचाराची ४ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम वर्ग केली. मुख्यमंत्री निधी कक्षातील अंतर्गत छाननीत हा सगळा प्रकार बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीने पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर घुगे या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.