

डोंबिवली : रूग्णालयात उपचार घेत आहे. सीटीस्कॅन करायचे आहे. तातडीने पैशांची गरज आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवितो. ते पैसे तुम्ही मला ऑनलाईनच्या माध्यमातून क्युआर कोडद्वारे स्कॅन करून परत पाठवा, अशा पद्धतीने डोंबिवलीतील व्यावसायिकाला अज्ञात इसमाने फोन करून सांगितले. उपचारांसाठी सहकार्य म्हणून, तसेच पैसेही परत मिळतील असे वाटल्याने व्यावसायिकाने तात्काळ संबंधिताला ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे पाठविले. त्यानंतर मात्र सदर इसमाने आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर व्यावसायिकाने रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात राहणारे विजय गजरा हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ विक्रेते म्हणून व्यवसाय करतात. गेल्या महिन्यात तक्रारदार विजय गजरा यांच्याशी एका इसमाने संपर्क साधला. मी दीपुभाई मोरेनावाला बोलत आहे. मला सेव्हन हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तातडीने सीटी स्कॅन करायचे आहे. मला तातडीने पैशांची गरज आहे. मी तुम्हाला ३८ हजार रूपये ऑनलाईनच्या माध्यमातून पाठवितो. त्यानंतर मी तुम्हाला माझा आर्थिक व्यवहाराचा क्युआर कोड पाठवितो. त्यावर तुम्ही मला मी पाठविलेले पैसे पाठवा, असे सांगितले.
दीपुभाई मोरेनावाला असे नाव सांगणाऱ्याने विजय गजरा यांना ३८ हजार रूपये ऑनलाईन माध्यमातून पाठविल्याचा मेसेज पाठवला. हा मेसेज पाहून आपल्या बँक खात्यात दीपुभाई याचे पैसे जमा झाले असावेत, असे वाटल्याने विजय गजरा यांनी दीपुभाई याने पाठविलेल्या क्युआर कोडच्या माध्यमातून त्याला १८ हजार रूपये पाठविले. उपचारांकरिता पैशाची तातडीने गरज असल्याने विजय गजरा यांना आधी संशय आला नाही.
पैसे पाठविल्यानंतरही दीपुभाई याने विजय गजरा यांच्याशी सतत संपर्क करून उर्वरित पैसे पाठविण्याची मागणी करू लागला. त्यानंतर मात्र विजय गजरा यांना संशय आला म्हणून त्यांनी आपल्या बँक खात्यात पैसे पाठविलेत आहेत का याची खात्री केली तेव्हा त्यांना ते पैसे आपल्या बँक खात्यात जमा झालेच नसल्याचे लक्षात आले. दीपुभाई असे नाव सांगणाऱ्याने बदमाशाने पैसे जमा झाल्याचे बनावट मेसेज पाठवून आपली फसवणूक करून १८ हजार रूपये खोटे उकळले आहेत. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर व्यावसायिक विजय गजरा यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.