

डोंबिवली : कल्याणमध्ये दगडाने एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या अयशस्वी प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही, मात्र त्यांनी बँकेचे सुमारे दोन लाखांचे नुकसान केले. मंगेश जगताप आणि नौशाद अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कल्याण पश्चिमेकडील आचार्य अत्रे रंगमंदिराजवळील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दोन व्यक्तींनी पैसे चोरण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनवर दगडाने जोरदार प्रहार केले. मात्र, त्यांना पैसे काढण्यात यश आले नाही. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याआधारे आरोपींचा माग काढला. अवघ्या सहा तासांच्या आत पोलिसांनी घाटकोपर येथील मंगेश भीमराव जगताप (३६) आणि कल्याणमध्येच फुटपाथवर राहणाऱ्या नौशाद अहमद अन्सारी (२२) या दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या दोघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत का आणि त्यांनी अशाच प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौड यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.