Thane News : मनपा निवडणुका स्वबळाचा निर्णय फडणवीस घेणार
Fadnavis decision own strength municipal elections
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
भाजप - शिवसेना भाऊ आहेत, हे शंभर टक्के खरे आहे. मात्र मोठा आणि लहान भाऊ कोण ? हे येणारा काळ ठरवेल. आगामी महापालिका निवडणुका भाजपने स्वबळावर लढवाव्या, असा कार्यकत्यांकडून आग्रह धरला जात असला तरी भाजपमध्ये व्यक्तिगत मत विचारात घेतले जात नाही. यासंदर्भातील निर्णय पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरवतील, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टीची कोकण विभागाची कार्यशाळा आज ठाण्यात झाली. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, प्रदेश सरचिटणीस विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेमध्ये कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षामध्ये वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर, जिल्हा अध्यक्ष संदिप लेले यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याची मांडलेल्या भूमिकेला महत्व नसल्याचे स्पष्ट करीत महापालिका निवडणुका स्वबळावर की महायुतीत लढवायाच्या याचा निर्णय पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड आणि मुख्यमंत्री फडणवीस हे घेतील, असे स्पष्ट केले. तसेच ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणासारख्या विषयावर पक्षाने मला अद्याप बोलण्याची जबाबदारी दिली नसल्याचे सांगून चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाबाबत बोलणे टाळले.
राज्यभरात गेल्या तीन ते चार महिन्यापासून संघटन पर्वाच्या अनुषंगाने विभागीय कार्यशाळा होत असून त्याचा अंतिम टप्पा ठाण्यात झाला. राज्यातील भाजपचे ८० जिल्हाध्यक्ष, १२०० पेक्षा अधिक मंडळ अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे. त्याच्या कार्यशाळा झाल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ११ वर्षात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत कशी पोहचावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कपिल पाटील आणि आमदार कथोरे यांच्यातील कटुता कायम ?
ठाण्यातील भाजपच्या कोकण विभागीय कार्यशाळेच्या उद्धघाटनाच्यावेळी माजी मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे हे दोघे एकत्रितपणे दीपप्रज्वलन करण्यात आले नाही. त्यावेळी बनमंत्री गणेश नाईक यांनी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे मी, कपिल पाटील आणि किसन कथोरे तुम्ही दोघे ही या असे विनंती केली. कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील पुढे जाऊन दोघांना दीपप्रज्वलन करण्यासाठी बोलवून घेतले. त्यावरून पाटील-कथोरे यांच्यातील कटुता अजूनही कायम असल्याचे दिसून आले.

