

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : Thane Heavy Rains : मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्यासह आणि मुंबईला झोडपडले आहे. एकप्रकारे ठाणेकर आणि मुंबईकर यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण दुसरीकडे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अंबरनाथ कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यातच अंबरनाथ तालुक्यातील सहवास वृद्धाश्रम व सत्कर्म अपंग मुलांच्या आश्रमातील 40 जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कल्याण आणि अंबरनाथ या दोन तालुक्यातील 107 कुटुंबामधील 407 जणांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून कल्याण आणि मुरबाडमधील रायता, रुंदे पूल, चिखली, घोरला हेचार पूल हे पाण्याखाली गेल्यामुळे रस्ते बंद झालेले आहेत. त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे. कल्याण -मुरबाड आणि मुरबाड-शहापूर हा रस्ता बंद झालेला आहे. बारावी धरण, तानसा, भातसा या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तासातसाला दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत आहे.
तानसा धरण भरून वाहू लागल्याने धरणातून प्रति सेकंद 595 घनमीटर पाणी यांचा विसर्ग करण्यात आल्यामुळे धरण आता 99.18 टक्के भरल्याचे दिसून येते. उल्हास नदीला पूर आल्याने अंबरनाथ, बदलापूर कल्याण मुरबाड आणि भिवंडी तालुक्यातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याचा दिसून येते. एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यासाठी तैनात केली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.