

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील पाणीपट्टी (मीटर, नॉन मीटर) तसेच मालमत्ता कराची बिले वाटप करण्यातून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या 265 महिलांना रोजगार मिळाला. बचतगटातील महिला दरमहा 4 ते 5 हजार बिले वितरित करत असून त्याद्वारे एका महिलेस किमान 30 ते 40 हजार रुपये मिळत आहेत.
बचतगटातील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील पाणीपट्टी तसेच मालमत्ता कराची बिले महिला बचत गटातील महिलांच्या मार्फत करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला दिले.
1 मे 2024 पासून या बिल वाटपास बचतगटातील महिलांमार्फत प्रारंभ झाला. कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, सहाय्यक आयुक्त बळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक माया पोटोळे, जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, वंदना कवटे, योगिनी भिलारे, अंजली परब, रंजना सातपुते यांनी यासाठी महिलांना मार्गदर्शन केले.
या कामातून 265 महिलांना रोजगार मिळाला असून एक महिला सध्या दिवसाकाठी सुमारे 200 ते 250 बिलांचे वितरण करते. महिन्याला 4 ते 5 हजार बिले महिलांनी महिनाभरात वितरित केली असून त्यापासून त्यांना सुमारे 30 ते 40 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.