

ठाणे : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा दिलेला शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हंबरडा मोर्चाची खिल्ली उडवत उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांबाबतचे पुतना मावशीचे प्रेम असल्याची बोचरी टीका केली. कधी उंबरडा न ओलांडलेले ठाकरे आता हंबरडा मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
म्हाडाच्या घरांच्या सोडत आज उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना नामदार शिंदे यांनी ठाकरे यांचा मराठवाड्यातील हंबरडा मोर्चा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असून मगरीचे आश्रू असल्याचे म्हटले आहे. आम्ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा बांधावर गेलो त्याचे अश्रू पुसले, त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्यावर मोठे संकट आले, पशुधन वाहून गेले, शेती वाहून गेली, त्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे त्यांचे अश्रू पुसून शेतकऱ्यांशी खंबीर पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. सर्व अटीशर्ती बाजूला ठेवून मदत करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याच्या मदतीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचा पॅकेज देण्यात निर्णय घेतला. आम्ही दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, तो शब्द पळाला आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागल्याचे समाधान नामदार शिंदे यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करून मनरेगाच्या माध्यमातून ३ लाख देण्याचा निर्णय शेतकऱ्यांची चिंता मिटवल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. एवढी मदत दिल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या नावाखाली मोर्चे काढत आहेत. हे निव्वळ राजकारण करून शेतकऱ्याच्या बांधांवर जाताना पूरग्रस्त मुलांच्या हातावर ठाकरे यांनी कधी बिस्किटचा पुडा तरी ठेवला का ? आम्ही सर्व मदत दिली आहे. ठाकरे हे केवळ शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी केली.