

भिवंडी (ठाणे) : राज्यातील विविध विभागांतर्गत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा चालविल्या जातात. यापैकी शासन अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शाळांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत आहे. सर्वसाधारण मर्यादांपलीकडे या कामांचा ताण वाढल्यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या मुळ कामावरून त्यांचे लक्ष विचलित होत आहे. तसेच त्यांच्या शरीरावर देखील विपरीत परिणाम होऊन ते दुर्धर आजारांनी ग्रस्त होऊ लागले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून ऑनलाईन डेटा अपडेट करून शिक्षकावरील ताण व भार कमी करण्याची मागणी शिक्षण क्रांती संघटनाचे राज्यस्तरीय अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
ऑनलाईन कामामध्ये युडीएसइ, युडीएसइ पोर्टलवर आधार वैधता, शाळा सोडून गेलेले व सतत गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकून ड्रॉप बॉक्स क्लियर करणे, बाह्य शाळेतील मुले इम्पोर्ट करणे, उच्च माध्यमिक वर्गाचे सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती विषय निहाय भरणे, निपूण महाराष्ट्र अंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे, शाळेची पूर्ण माहिती भरणे, ईको क्लबवर माहिती भरणे, एसएचपीआर वर शाळा सुरक्षितता विषयी माहिती भरणे, एक पेड माँ के नाम, लोकेशन सह शाळा मॅपिंग, १०० कोटी वृक्ष लागवड, एनएमएमएस तसेच चार-पाच प्रकारच्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी पोर्टल भरणे, नॅशनल बिल्ड कॉन २०२५ वर रजिस्ट्रेशन, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क भरणे, आनंददायी शनिवार उपक्रम, ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टीम, उपक्रम, चर्चा प्रज्ञावंताशी उपक्रम, टेस्ट अभ्यासक्रम, तमन्ना / सायकोमेट्रिक टेस्ट, अटल टिंकरोंग लॅब / आयसीटी लॅब / सायन्स मॅथ्स किट / रोबोटिक किट / जायी पिटारा, स्मार्ट क्लासरूम, प्रश्नपेढी, शालेय पोषण आहार, उल्हास ॲप, पालक सभा, दीक्षा ऍप, शासनाचे विधी योजना अशा अनेक ऑनलाइनच्या काही अंशी निरर्थक कामांमध्ये शिक्षक व्यस्त राहिल्यास हे शिक्षक विदयार्थ्यांच्या अभ्यासाकडे कसे लक्ष देऊ शकतील ? पूर्वी शिक्षक शाळेत आज काय शिकवायचे याची पूर्वतयारी करून येत होते. तर आता हाच शिक्षक शाळेत गेल्यावर ऑनलाईनचे काय काम करावे लागेल ? याची धास्ती घेऊन शाळेत येतो.
वाढलेल्या कामामुळे शिक्षक तणावाखाली
ऑनलाईन काम करण्यासाठी डेटा भरणे हे जरी अत्यावश्यक असले तरी त्याला मर्यादाही असणे तेवढेच आवश्यक आहे. शिक्षकांचे अध्यापनाच्या मूळ कामावरून लक्ष विचलित होऊ नये यासाठी वेळीच अशा कामांना आळा घालणे गरजेचे आहे. या वाढलेल्या कामाने शिक्षकही सतत ताणतणावाखाली राहत आहे. यामुळे अनेक शिक्षक मधुमेह, रक्तदाबाच्या दुर्धर आजारांनी ग्रासले आहेत. यासाठी निवडक तज्ञांची समिती स्थापन करून वर्षभरातून एकदाच ज्यावेळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली असते, अशा वेळी ही माहिती भरून वर्षभराच्या ताण तणावातून शिक्षकांना मुक्त करावे, अशा शिक्षकांच्या वेदना संघटनेने शासनापुढे मांडल्या आहेत. या सर्व घटनेची दखल घेत शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव रणजीतसिंग देओल यांच्याकडे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावरील ऑनलाईन डेटा अपडेट करण्याचा ताण व भार कमी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.