

डोंबिवली : बजरंग वाळुंज
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे, हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधिश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला. हे प्रकरण कल्याण न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्याचा अन्य धर्मियांचा दावा न्यायालयाने फेटाळल्याची माहिती या खटल्यातील याचिकाकर्ते आणि हिंदू मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख यांनी मंगळवारी (दि.10) माध्यमांना दुर्गाडी किल्ल्याजवळ बोलताना दिली.
गेल्या पन्नास वर्षापासून दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद हा दोन धर्मियांमधील दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. यापूर्वी हा दावा ठाणे जिल्हा न्यायालयात सुरू होता. त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला होता, असे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले. या दाव्यासंदर्भात माहिती देताना याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी माध्यमांना सांगितले, 1971 मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर याठिकाणी मंदिर की मस्जिद असा एक चौकशी अर्ज दाखल करण्यात आला होता. या दाव्यात हिंदू समाजातर्फे ॲड. भाऊसाहेब मोडक यांनी बाजू मांडली. मस्जिदीला खिडक्या नसतात. याठिकाणी मंदिराला खिडक्या आहेत. याठिकाणी मूर्ती ठेवण्यासाठी देवालय (चौथरा) आहे. त्यामुळे ही वास्तू मंदिर आहे, असे तेव्हा शासनाने जाहीर केले होते.
दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर नसून मस्जिदच आहे, असा अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयाकडे 1975-76. मध्ये दाखल झाला. त्यानंतर दोन वर्ष हा दावा सुरू होता. त्यानंतर हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला. त्यावेळी हा वक्फ आहे. हा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातून वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा, अशी मागणी अन्य धर्मियांनी केली. ही मागणी फेटाळत न्यायालयाने दुर्गाडी किल्ला येथे मंदिरच आहे, असे सांगत शासनाचा यापूर्वीचा निर्णय मान्य केला, असे याचिकाकर्ते दिनेश देशमुख यांनी सांगितले. याप्रकरणात हिंंदू समाजातर्फे ॲड. भिकाजी साळवी, ॲड. सुरेश पटवर्धन, ॲड. जयेश साळवी, सरकार पक्षातर्फे ॲड. सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले.
या प्रकरणात विजय उर्फ बंड्या साळवी, आ. विश्वनाथ भोईर, रवींद्र कपोते, अरविंद मोरे, छाया वाघमारे , पराग तेली, सुरेंद्र भालेकर, विजय काटकर, अमोल जव्हेरी, राजन चौधरी, अनिल तिवारी, विजया पोटे हे याचिकाकर्ते होते. दावेदार होते. या निर्णयाला अन्य धर्मियांनी उच्च न्यायालयात स्थगिती मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हिंदुत्वाचा विजय मागील पन्नास वर्षापासून हा दावा सुरू होता. दु्र्गाडी किल्ल्यावर आपलाच दावा असल्याचा दावा अन्य धर्मिय करत होते. न्यायालयाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट झाले. आणि हा हिंदुत्व, सत्याचा विजय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शामुळे पावन झालेली ही भूमी आहे. या किल्ल्यावर शिवाजी महाराज येऊन गेले आहेत. हा किल्ला आणि येथील मंदिरासाठी हिंदू समाजाचे कल्याणमधील अग्रणी मंदिराच्या हक्कासाठी लढत होते. न्यायदेवतेने आपली बाजू मान्य केली. हिंदुत्व व सत्याचा विजय झाला आहे, असे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले. शिवकाळापासून दुर्गाडी किल्ल्याला इतिहास आहे. हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार कल्याणमध्ये सुरू झाले. पूर्वीपासून याठिकाणी हिंदू समाजाचा हक्क होता. तो न्यायालयाच्या निर्णयामुळे आता मान्य झाला, असे कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले