Duplicate Voters : संभाव्य दुबार मतदारांची छाननी निवडणूक विभागाकडून पूर्ण
ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची पडताळणी करून संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ८३,६४५ संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली. मतदार यादी पडताळणीत ६७ हजार ७१ मतदारांची नावे व फोटो एकमेकांशी जुळत नाहीत. मात्र हे मतदार दुबार मतदार नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील दोन स्टार चिन्ह हटविण्यात येणार असून या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८३,६४५ संभाव्य दुबार असल्याची यादी निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे या दुबार मतदारांच्या छाननीचे काम देखील सुरू करण्यात आले होते. दरम्यान मतदार यादीत नाव व फोटो पूर्णतः समान असलेले १६,५७४ मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मतदारांच्या नावासमोर दोन स्टार चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून, सदर मतदारांच्या नावापुढे दुबार मतदार असा शिक्का मतदार यादीत असणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून देऊन मतदान करता येईल. दुबार मतदान टाळण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित मतदाराने आपण एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करीत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.
निवडणूक सुरळीतपणे पार पडेल...
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, दुबार व बनावट मतदानास आळा घालणे तसेच पात्र मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवणे, या उद्देशाने ही छाननी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मतदार यादी अचूक व दोषमुक्त असणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, प्रशासनाकडून ही कार्यवाही काटेकोरपणे करण्यात येत आहे. या सुधारणांमुळे ठाणे महानगरपालिका निवडणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

