सापाड : योगेश गोडे
कल्याण प. उंबर्डे डम्पिंग प्रकल्पावरील कचर्याला मोठी आग लागली असून आगीच्या धुराचे लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिक हैराण झाले आहेत.
मंगळवारी (दि.25) रोजी दुपारच्या सुमारास ही आग लागली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाच्या आठ बंब वरील कर्मचारी ही आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल चार तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. धुराचे लोट आजूबाजूच्या गावात पसरून नागरिक हैराण झाले असल्यामुळे ग्रामस्थांनी दारे खिडक्या बंद करून धूर निवरण्याची वाट बघू लागले होते.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 3 उंबर्डे परिसरात शास्त्रोक्त भराव भूमी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या शास्त्रोक्त भराव भूमी प्रकल्पाची क्षमता 350 मे. टन आहे. सध्या या प्रकल्पावर कचरा क्षमतेपेक्षा जास्त येत असल्याने उर्वरित कचरा प्रकल्पावर डंप होऊन राहतो. कचर्याच्या ढिगारामध्ये उष्णतेमुळे गॅस निर्मिती होत असल्याने कचर्याला वारंवार आगीच्या घटना घडत आहेत.
मंगळवारी (दि.25) दुपारच्या सुमारास उंबर्डे येथील भराव भूमी प्रकल्पावरील डंप केलेल्या कचर्याला अचानक आग लागल्याने धुराचे लोट आजूबाजूच्या गावात पसरल्याने ग्रामस्थांनी याची माहिती महापालिका प्रशासनास दिली. यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करत आहेत. आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले असल्याने आग आणखी पसरण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
उंबर्डे येथील शास्त्रोक्त भराव भूमी प्रकल्पाची क्षमता 350 मेट्रिक टन असून बारावे येथील शास्त्रोक्त भराव भूमी प्रकल्पाची क्षमता 250 मेट्रिक टन आहे. मात्र शहरातील कचर्याच्या प्रमाणापेक्षा प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कचरा डंप करून ठेवावा लागतो. डंप केलेल्या कचर्यामुळे प्रकल्पावरील कचर्याला वारंवार आग लागत आहे.
बळवंत वेळेकर, ग्रामस्थ, कल्याण प. उंबर्डे, ठाणे.

