

भाईंदर : मिरा- भाईंदर महापालिकेतील इनोव्हेशन सेलमध्ये स्वच्छ भारत मिशन (एसबीएम) साठी काम करणारे दोन कर्मचारी मुंबई महापालिकेतही एसबीएमसाठी नोकरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. हे दोन्ही कर्मचारी दुहेरी वेतनाचा बेकायदेशीर लाभ घेत असल्याने मिरा-भाईंदर महापालिकेने दिलेले वेतन त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी होऊ लागली आहे.
यातील एक कर्मचारी महिला असून त्यांची घनकचरा विभागात बदली करण्यात आली आहे. तत्पूर्वी ही महिला कर्मचारी इनोव्हेशन सेलमध्ये सीईजीपी फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून शहर समन्वयक म्हणून कार्यरत होती. तर दुसरा कर्मचारी देखील याच संस्थेच्या माध्यमातून इनोव्हेशन सेलमध्ये एसबीएम एक्सपर्ट या पदावर कार्यरत आहे. हे दोन्ही कर्मचारी मुंबई महानगपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागात सुद्धा युनायटेड फॉर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील महिला कर्मचारी मुंबई महापालिकेत प्रोजेक्ट मॅनेजर, तर दुसरा कर्मचारी प्रोजेक्ट हेड या पदावर नोकरी करीत असल्याचे उजेडात आले आहे.
महिला कर्मचार्याला मिरा-भाईंदर महापालिकेच्या आस्थापनेतून सुमारे 45 हजार रुपये प्रती महिना वेतन अदा केले जाते, तर दुसर्या कर्मचार्याला सीईजीपी फाऊंडेशनकडून सुमारे 70 हजार वेतन अदा केले जात आहे. त्याच प्रमाणातील वेतन मुंबई महापालिकेकडून त्यांना अदा केले जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
हे दोन्ही कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्या महिला कर्मचार्याची मिरा-भाईंदर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच हे दोन्ही कर्मचारी काही वरिष्ठ अधिकार्यांच्या संगनमताने कंत्राटे मिळवित असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.