

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा कल्याण जवळच्या शहाड-बंदरपाडा रोडवर थरारक घटना घडली. कल्याण परिमंडळ ३ च्या विशेष कारवाई पथकासह खडकपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एमडी पावडरची तस्करी करणाऱ्याला बेड्या ठोकून गजाआड केले. हाशमी जाफर हुसैन जाफरी (३३) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव असून त्याच्याकडून ३० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजय नाईक, सपोनि अनिल गायकवाड यांच्यासह पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळच्या सुमारास गस्त घालत होते. कल्याण जवळच्या बंदरपाड्याकडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या गावठाण रोडला एकजण रस्त्याच्या कडेला जाफरी संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. त्याच्याकडे असलेल्या एम एच ०४/ के जे/८८६४ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कूटरच्या डिकीत काहीतरी संशयास्पद सामान-वस्तू असाव्यात, असा पथकाचा संशय बळावला. या पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर सापडली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात २, तर डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात १ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे हाशमी जाफरी याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत प्रतिबंधकात्मक कारवाई देखिल करण्यात आली आहे.