coastal drug trafficking : ड्रग्ज माफियांची नजर कोकण किनारपट्टीवर

राज्यातच ड्रग्ज निर्मितीचे कारखाने उभारण्याचा कट
coastal drug trafficking
ड्रग्ज माफियांची नजर कोकण किनारपट्टीवरpudhari photo
Published on
Updated on
ठाणे : नरेंद्र राठोड

मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या महानगरांमधील अमली पदार्थांची प्रचंड वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आता राज्याबाहेरून तस्करी करण्याऐवजी, थेट राज्यातच ड्रग्ज निर्मितीचे कारखाने उभारण्याचा धोकादायक कट ड्रग्ज माफियांनी रचला आहे. यासाठी त्यांची नजर शांत आणि निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवर असल्याचे ठाणे पोलिसांच्या विविध कारवायांमध्ये झालेल्या खळबळजनक खुलाशांमधून समोर आले आहे. पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवायांमुळे कोकणात ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचे अनेक प्रयत्न उधळले आहेत. हे या धोक्याची तीव्रता दर्शवतात.

गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील पेण येथील एका फार्महाऊसमध्ये ‘एमडी’ ड्रग्ज बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. मुख्य सूत्रधार मनोज पाटील ऊर्फ बाळा याच्यासह आठ जणांना अटक करून पोलिसांनी 55 लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज आणि निर्मितीचे साहित्य जप्त केले. या टोळीने जून ते नोव्हेंबर 2023 या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची निर्मिती केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

रत्नागिरीतील अयशस्वी प्लॅन

हरियाणातील ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई झाल्यानंतर, अभिषेक कुंतल नावाच्या तस्कराने रत्नागिरीतील खेड येथील लोटे एमआयडीसीमध्ये ‘एमडी’ ड्रग्जचा कारखाना उभारण्याची योजना आखली होती. त्यासाठी मशिनरी खरेदी केली होती; पण ‘ब्रोमिन’ हे महत्त्वाचे केमिकल न मिळाल्याने हा प्लॅन फसला आणि फॅक्टरी तेलंगणाला हलवण्यात आली, जिथे डीआरआयने त्यावर छापा टाकला. या घटनांवरून स्पष्ट होते की, शांत आणि तुलनेने कमी वर्दळीचा प्रदेश म्हणून माफिया कोकणचा वापर ड्रग्ज निर्मितीचे केंद्र म्हणून करू पाहत आहेत.

आकडेवारीचा आरसा : मागणी आणि जप्ती

वाढते व्यसन : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अहवालानुसार, भारतात 2019 मध्ये 1.8 कोटी असलेली ड्रग्ज सेवन करणार्‍यांची संख्या 2023 अखेर 3.4 कोटींवर पोहोचली आहे. अमली पदार्थांचा महापूर : क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, गेल्या वर्षभरात देशात 20 हजार कोटी, तर महाराष्ट्रात 5 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

मुंबई-ठाणे हॉटस्पॉट : केवळ मुंबईतच 2024 मध्ये आतापर्यंत 4,240 कोटींचे ड्रग्ज पकडले गेले आहेत, तर ठाण्यात 17 कोटींचे ड्रग्ज जप्त करून 4 हजार गुन्हे दाखल झाले आहेत.

रेव्ह पार्ट्या : ड्रग्ज विक्रीचे नवे अड्डे ड्रग्जच्या वाढत्या प्रसारामागे ‘रेव्ह पार्ट्यां’चा मोठा हात आहे. या पार्ट्या म्हणजे ड्रग्जच्या विक्री आणि जाहिरातीसाठीचे एक मोठे व्यासपीठ बनल्या आहेत.

नव्या ड्रग्जची ओळख : माफियांनी बाजारात आणलेले नवीन ड्रग्ज नमुना म्हणून या पार्ट्यांमध्ये तरुणांना मोफत दिले जातात.

कोड लँग्वेजचा वापर : ‘म्याव म्याव’, ‘पावडर’, ‘पेपरबॉम्ब’, ‘गोली’ अशा सांकेतिक नावांनी येथे ड्रग्जची विक्री होते.

औषधांचा गैरवापर : पोलिसांना चकवा देण्यासाठी कफ सिरप, व्हाईटनर आणि पेन किलरसारख्या औषधांचाही नशेसाठी सर्रास वापर केला जातो.

बॉलीवूड कनेक्शन : एक जुने नाते

बॉलीवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन अनेकदा समोर आले आहे. सोलापूरमधील एव्हॉन कंपनीतून 2000 कोटींचे एफेड्रीन जप्त करण्याच्या प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांचा सहभाग असो, किंवा क्रूझवरील कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक असो, या घटनांनी बॉलीवूडमधील ड्रग्जचा विळखा किती घट्ट आहे, हे दाखवून दिले आहे.

तस्करी : डार्क वेब, सागरी मार्ग

डार्क वेब : आंतरराष्ट्रीय बाजारातून ड्रग्ज मागवण्यासाठी ‘डार्क वेब’ या इंटरनेटच्या छुपे जगताचा वापर केला जातो. येथे वापरकर्त्याची ओळख गुप्त राहते.

सागरी मार्ग : भारतात येणार्‍या अमली पदार्थांची सर्वाधिक तस्करी पाकिस्तानमधून सागरी मार्गाने होते. अफगाणिस्तानातील अफूच्या उत्पादनावर तालिबानचे नियंत्रण असून, तेथून हेरॉइन आणि इतर ड्रग्ज पाकिस्तानमार्गे भारतात पाठवले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news