

डोंबिवली : डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील रहिवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मंगळवारी (९ डिसेंबर) शहराचा पाणीपुरवठा तब्बल १५ तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत डोंबिवलीचा संपूर्ण पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
उल्हास नदीतून पाणी उचलून नेतिवली येथील १५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात ते शुद्ध केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाच्या असलेल्या फिल्टरबेड आऊटलेट पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, अमृत २.० योजनेअंतर्गत खंबाळपाडा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या उंच जलकुंभाला मुख्य इनलेट जलवाहिनीशी जोडण्याचे महत्त्वाचे कामही याच शटडाऊनच्या काळात पूर्ण केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, डोंबिवली विभागातील वितरण व्यवस्थेतील इतर आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामेही याच वेळी केली जाणार आहेत. परिणामी, वरील सर्व तांत्रिक कामांसाठी नेतिवली जलशुद्धीकरण केंद्राचा १५ तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे.
पाणी पुरवठा बंद असल्यामुळे डोंबिवलीकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी मंगळवारी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक तेवढा पाण्याचा साठा अगोदरच करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. या काळात महापालिकेला सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यावर सुरुवातीला काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे, असेही पालिकेने सांगितले आहे.