

डोंबिवली : १४ गावांपैकी असलेल्या ठाकूर पाड्यातील वैतागलेल्या ग्रामस्थांनी उपरोधिक टीका करणाऱ्या बॅनर्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसह शासन/प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. उपरोधिक टोलेबाजी करणाऱ्या या बॅनर्सच्या माध्यमातून ग्रामस्थांनी विद्यमान लोकप्रतिनिधींसह त्यांना निवडून आणणाऱ्या मतदारांचेही आभार मानले आहेत.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामार्ली, नारिवली, बाळे, नागाव, भंडार्ली, उत्तरशीव, घोटेघर या १४ गावांचा समावेश नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. तथापी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसून नवीमुंबई महापालिकेने अद्याप या गावांचे दप्तरदेखील हाती घेतलेले नाही. या गावांच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. मात्र शासनाकडून हा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे १४ गावांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत मंत्री नाईक यांनी गावांना विरोध दर्शविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी एकीकडे १४ गावांतील विकासकामे ठप्प झाली आहेत.
तर दुसरीकडे या गावांतील ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. यातून लोकप्रतिनिधींच्या प्रती असलेला ग्रामस्थांचा क्रोध बॅनर्सच्या माध्यमातून बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. ठाकूर पाड्यातील ग्रामस्थांनी या बॅनर्सवर कुणाच्याही नावांचा उल्लेख केला नसून आजी-माजी लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. विद्यमान आमदार, खासदार, तसेच स्थानिक माजी सरपंचांनी गावागावांची केलेली दुर्दशा आणि खड्डेमय रस्त्यांचे चित्र बॅनर्सच्या माध्यमातून समोर आणले आहे. रोजच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी या सर्वांचे आभार मानले आहेत. आणि अशीच आमची सेवा करत राहण्यासाठी अशाच प्रकारचे दर्जेदार रस्ते देण्यासंदर्भात आभार मानणारे बॅनर्स लावल्याचे आढळून आले. या बॅनर्सच्या छब्या समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत.
काय म्हणतात बॅनर्सवर ग्रामस्थ ?
कल्याण ग्रामीणचे आमदार साहेब, लोकप्रिय आणि संसदरत्न खासदार साहेब तसेच माजी सरपंच चौदा गाव आणि ग्रामपंचायतीचे अत्यंत प्रमाणिक ग्रामसेवक मौजे ठाकूरपाडा येथे चांगला दर्जेदार आणि उत्तम असा रस्ता दिल्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि या सर्वांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे पण मनःपूर्वक अभिनंदन - त्रस्त ठाकूरपाडा निवासी