Dombivli News | डोंबिवलीची स्मिहा झळकणार ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेत

महाराष्ट्रातील ३५०० मुलींमधून पहिल्या ६ जणींमध्ये निवड, सावित्रीबाई फूले यांच्या पहिल्या शाळेतील विद्यार्थींनी सोन पवारची भूमिका साकारणार!
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या सोबत स्मिहा पाटोळे
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या सोबत स्मिहा पाटोळे
Published on
Updated on

डोंबिवली : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणक्रांतीचा गौरवशाली इतिहास आता डिजिटल पडद्यावर जिवंत होणार आहे. जगदंब क्रिएशन निर्मित सावित्रीबाई जोतीराव फुले, ही ऐतिहासिक मालिका २० जूनपासून मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी मालिका विश्वातील या आगळ्यावेगळ्या प्रयोगात डोंबिवलीतील ९ वर्षीय स्मिहा पाटोळे हिने बाजी मारली आहे. महाराष्ट्रभरातील ३५०० विद्यार्थीनींमधून सावित्रीमाईंच्या पहिल्या शाळेतील सहा विद्यार्थींनीपैकी एक असलेल्या सोनू पवारची भूमिका साकारण्यासाठी स्मिहा पाटोळेची निवड झाली आहे.

खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्मिहा पाटोळे हिची निवड समाज माध्यमांवरून जाहीर केली आहे. स्मिहा पाटोळे ही डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिर शाळेत चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत घेते. सावित्रीमाईंच्या पुणे येथील भिडेवाड्यातील पहिल्या शाळेत १ जानेवारी १८४८ रोजी दाखल झालेल्या सहा धाडसी मुलींपैकी सोनू पवार ही एक होती. तीच ऐतिहासिक व्यक्तिरेखा डोंबिवलीकर स्मिहा पाटोळे ही कॅमेऱ्यासमोर साकारणार आहे. लहान वयातच सामाजिक बदलाचा साक्षीदार बनणाऱ्या सोनूच्या भूमिकेद्वारे स्मिहा नव्या पिढीला तो प्रेरणादायी इतिहास दाखवणार आहे.

काट्याच्या स्पर्धेतून निवड

स्मिहासाठी मिळालेली ही संधी सोपी नव्हती. मालिकेतील ६ विद्यार्थिनींच्या भूमिकांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ३५०० मुलींनी ऑडिशन दिली होती. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नसतानाही स्मिहाने केवळ तिच्या उपजत कला-गुणांनी, स्पष्ट उच्चारांनी आणि निरागस अभिनयाने परीक्षकांचे मन जिंकले. हजारोंच्या गर्दीतून ती सहा जणींमध्ये स्थान मिळवू शकली.

१२ तासांचे शूटिंग अन् स्मिहाची जिद्द

नऊ वर्षाच्या स्मिहासाठी फिल्मसिटीचे जग पूर्णपणे नवीन आहे. डोंबिवली ते गोरेगाव फिल्मसिटी असा लांबचा प्रवास आणि सेटवर सलग १२ तासांचे शूटिंग हे तिच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र स्मिहा या आव्हानाला खेळासारखे घेत आहे. संवादांचे पाठांतर, कॅमेऱ्यांची अँगल आणि दिग्दर्शकांच्या सूचना ती अचूकपणे पाळते. सेटवरील शिस्तबद्ध वावर आणि शिकण्याची ओढ पाहून सगळे तंत्रज्ञ तिचे कौतुक करतात.

स्मिहासह महाराष्ट्रातील ६ विद्यार्थीनीही मालिकेत झळकणार

अभिनय हे स्मिहाचे स्वप्न नसले तरी या प्रवासात तिला वक्तशीरपणा, मेहनत आणि वेळेचे नियोजन शिकायला मिळाले असल्याचे तिचे पालक सांगतात. सावित्रीमाईंच्या शैक्षणिक क्रांतीचा इतिहास उलगडणाऱ्या या मालिकेत पहिली विद्यार्थिनी साकारण्याचा मान स्मिहाला मिळाला आहे. हा केवळ तिचा नव्हे, तर डोंबिवलीकर आणि टिळकनगर विद्यामंदिरासाठी अभिमानाचा क्षण आहे. स्मिहासोबत कार्तिकी सोनार, सार्थकी रांजणीकर, अनघा शिंदे, गार्गी आहेर, शरण्या गायकवाड या राज्यभरातील इतर विद्यार्थीनीही या मालिकेत झळकणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news