

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर कल्याणच्या दिशेकडे असलेला नुकताच सुरू झालेला सरकता जिना पुन्हा बंद पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या सुविधेचा उपयोग प्रवाशांना होईल, अशी अपेक्षा असताना हा जिना वारंवार बंद पडत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
हा जिना बंदच ठेवायचा असेल, तर मग जुन्याच पद्धतीचा पायऱ्यांचा जिना बांधला असता तर योग्य झाले असते, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत मनसेने डोंबिवली स्टेशन मास्तरांची भेट घेतली. हा जिने तात्काळ दुरूस्त करा, करण्यासाठी अन्यथा मनसे स्टाईलने रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे माजी नगरसेवक ॲड. मनोज घरत यांनी दिला आहे.
डोंबिवलीतील सरकता जिना चालू असतो, मात्र बहुतांशी वेळ तो बंद असतो. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा जुन्याच पद्धतीने पायऱ्या चढून स्कायवॉकवर किंवा फलाटावर जावे लागते. गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे स्थानकात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवाशांना वळसा घेऊन मोठ्या त्रासाने प्रवास करावा लागत होता. सरकता जिना सुरू झाल्यावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु गर्दीच्या मुख्य वेळेत विशेषतः सकाळ आणि सायंकाळी तोच जिना बंद राहत असल्याने प्रवाशांचा नाराजीचा पारा चढला आहे.
त्रस्त प्रवाशांनी अनेक वेळा स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र जिन्याची देखभाल व दुरूस्ती वेळेवर होत नसल्याने नव्याने बांधलेला हा जिना कुचकामी ठरला आहे. जिन्याच्या सततच्या बिघाडामुळे प्रवाशांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. परिणामी यामुळे जिन्याच्या तोंडाशी तसेच स्कायवॉकवर अनावश्यक गर्दी होऊन ढकलाढकलीची परिस्थिती उद्भवते. यातून एखादी दुर्घटना होऊन मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती प्रवासी वर्गाकडून व्यक्त केल्याचे मनसेचे माजी नगरसेवक ॲड. मनोज घरत यांनी सांगितले. डोंबिवली हे उपनगरीय रेल्वे मार्गावरील अत्यंत गर्दीचे स्टेशन असल्याने येथे पादचारी पूल, सरकते जिने व लिफ्टवर प्रचंड भार असतो. अशा परिस्थितीत नव्याने बांधलेला हा सरकता जिना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हा जिना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आंदोलन
डोंबिवली स्टेशनवरील नूतनीकरणाचे काम दीड वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. फलाट क्रमांक ३ आणि ४ वरील सरकता जिना सतत बंद राहत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही अडचण लवकर दूर करावी. प्रवाशांची तक्रार येता कामा नये. यासाठी डोंबिवली स्टेशन मास्तरांची पुन्हा एकदा भेट घेणार आहोत. जर लवकरात लवकर सुधारणा झाली नाही तर मात्र प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक ॲड. मनोज घरत यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.