Dombivli News | डोंबिवलीतील गाजलेले गोळीबार लूट प्रकरण : दोघा दरोडेखोरांना साडेपाच वर्षांचा सश्रम कारावास

विशेष मोक्का न्यायालयाचा दणका
Court News
Court NewsPudhari
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : आठ वर्षांपूर्वी २०१८ साली डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवर घडलेल्या आणि गाजलेल्या सशस्त्र दरोड्याच्या खटल्यात ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश विश्वास मोहिते यांनी दोघा खतरनाक दरोडेखोरांना दणका दिला आहे. या दोन्ही आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने ५ वर्षे ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. गोपाल राधेश्याम यादव (२१) आणि विकास महेंद्र सिंग (२०, दोघे रा. - नालासोपारा-पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत.

   या संदर्भात हकीकत अशी की, या प्रकरणातील फिर्यादी प्रदीप अशोक जैन (२३) हे मानपाडा रोडला असलेल्या कस्तुरी प्लाझा व्यापारी संकुलातील रमेश गोल्ड या दुकानात मॅनेजर म्हणून काम पाहत होते. २ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री साडेदहा वाजता दुकान बंद करून ते आणि केसरसिंग राजपुत हे दोन बॅगा घेऊन दुचाकीवरून युगंधर सुदामा इमारतीकडे जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवून बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.

प्रदीप जैन यांनी प्रतिकार करताच लाल टी-शर्ट घातलेल्या इसमाने स्टीलच्या फायटरने डोक्यावर मारहाण करून जखमी केले आणि निळा शर्ट घातलेल्या साथीदाराने त्याच्याकडील अग्नीशास्त्राने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रदीप जैन आरडाओरडा करताच स्थानिक रहिवासी आणि गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून दोघा लुटारूंना पकडले. त्यांच्याकडून फायटर आणि धारदार गुप्ती जप्त करण्यात आली.

यातील जखमींवर केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यातील जखमी प्रदीप जैन यांनी दिलेल्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३९७, ३०७, ३४१, ३४, भारतीय हत्यार कायद्याचे कलम ३, २५ (१) अ, ४, २७, मुंबई पोलिस  कायद्याचे कलम ३७ (३), १३५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हा खटला मोक्का स्पेशल केस म्हणून ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आला.      

अभ्यासपूर्ण युक्तिवादासह १७ साक्षीदारांची तपासणी

या खटल्याची प्रदीर्घ सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष मोक्का न्यायालयाचे विश्वास मोहिते यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील एसपीपी ॲड. संजय मोरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण युक्तिवाद करत १७ साक्षीदार तपासले. पंच, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी न्यायालयात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. जप्त केलेली हत्यारे, घटनास्थळ पंचनामा आणि जखमीचा वैद्यकीय अहवाल यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे भक्कम झाले. या खटल्यासाठी तपासाचे मार्गदर्शन कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल डीसीपी झेंडे आणि डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय मराठे यांनी केले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश मल्लाव यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले. संपूर्ण खटल्याच्या कालावधीत पैरवी अधिकारी सचिन भोसले रायटर परदेशी, व्ही. डी. सातपुते आणि ए. के. कोळी यांनी साक्षीदार न्यायालयात हजर ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

  साक्षी - पुराव्याअभावी एकाची सुटका 

अखेर ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाचे न्यायाधीश विश्वास मोहिते यांनी या खटल्यातील आरोपी गोपाल यादव आणि विकास सिंग या दोघांना सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड विधान कलम ३९३, ३४१, ३४ अन्वये ५ वर्षे ६ महिने सश्रम कारावास आणि प्रत्येकी १००० रुपये दंड, दंड न भरल्यास ३ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. जरी या गुन्ह्यात सुरुवातीला संशयित आरोपी महेंद्र झरू यादव याच्यासह तीन जणांची नावे होती, तरी पुराव्याअंती दोन आरोपींना शिक्षा झाल्याने विशेष सरकारी वकील एसपीपी ॲड. संजय मोरे यांच्यासह टिळकनगर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news