

डोंबिवली : शहराच्या पूर्वेकडील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फडके रोड क्रॉस मदन ठाकरे चौकात लक्ष्मी सागर या चाळीस वर्षे असलेल्या इमारतीचा दर्शनी भाग अचानक कोसळला. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अत्यंत वर्दळ आणि वाहतुकीच्या रस्त्याला लागून असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानी गाळ्यांच्या समोरच काँक्रीटचा भलामोठा भाग कोसळल्याने मोठा आवाज झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र इमारतीच्या भिंतींना देखिल तडे गेल्यामुळे दुकानदार आणि रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
लक्ष्मी सागर ही तळ + ४ मजली इमारती आहे. जवळपास चाळीस वर्षे जुनी असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर १६ दुकानी गाळे आहेत. तर या इमारतीत १८ सदनिका असून कुटुंबे रहिवास करत आहेत. पहिल्या मजल्यावर पोस्टाचे कार्यालय असून ते सायंकाळी ५ दरम्यान बंद करण्यात येते. या कार्यालयाशी संबंधित जवळपास हजारहून अधिक ठेवीदार आणि खातेदार आहेत. यात ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. या कार्यालयात कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सुदैवाने हे कार्यालय बंद होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
शिवाय तळमजल्यावरील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती. याच दुकानांच्या वर असलेला काँक्रीटचा भलामोठा सज्जा कोसळला. सुदैवाने इमारतीखाली ग्राहक वा पादचारी नव्हते. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. दर्शनी भाग कोसळताना मात्र मोठा आवाज झाला. आवाज ऐकून या इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ आपापल्या घरांबाहेर पळ काढला. दुर्घटना घडली तेव्हा एक घर वगळता अन्य १७ घरांमध्ये ३२ रहिवासी होते.
या दुर्घटनेची माहिती कळताच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखाप्रमुख अजय घरत यांनी घटनास्थळी पोहोचून मोबाईलद्वारे पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. या इमारतीतील सर्वांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी शाखाप्रमुख अजय घरत यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बघ्यांना हुसकावून लावून परिसर मोकळा केला. या इमारतीतील दुकानदार आणि रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
दोनच वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट
विशेष म्हणजे या इमारतीचे दोन वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पुढील दहा-पंधरा वर्षे तरी या इमारतीला कोणताही धोका नसल्याचे इमारतीतील रहिवाशांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत या इमारतीला धोकादायक व अतिधोकादायक अशा कोणत्याही नोटीसा बजावण्यात आलेल्या नाहीत. मात्र या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट कुणी केले ? इमारत भक्कम आहे तर सज्जा कसा कोसळला ? इमारतीच्या भिंतींना तडे कसे गेले ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तांत्रिक तपासणीनंतर मिळणार आहेत. त्यासाठी प्रशासनातर्फे तांत्रिक चौकशी वजा तपासणी करण्यात येणार असल्याचे ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले.