

डोंबिवली : धर्मवीर आनंद दिघे यांची २७ जानेवारी रोजी जयंती असते. या दिवशी शिवसैनिक, नेते मंडळी व दिघेंवर प्रेम करणारे असंख्य नागरिक उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात. पण त्यांच्या नावाने असलेल्या डोंबिवलीच्या निवासी विभागातील उद्यानाला सांडपाण्याने विळखा घातला आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मॉडेल स्कूलजवळ असलेले धर्मवीर आनंद दिघे उद्यान २००२ साली तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले आहे. कालांतराने या उद्यानाचे दोनदा सुशोभीकरण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते तथा तत्कालीन आमदार राजू पाटील यांच्या निधीतून करण्यात आले होते. परंतु आज रोजी केडीएमसीकडून या उद्यानाची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने हे उद्यान नेहमी दुर्लक्षित राहिले आहे.
आता तर या उद्यानात असणारा महापालिकेचा कंत्राटी सुरक्षारक्षक नेहमी गायब असतो. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी उघडे असणारे हे उद्यान उघडे असायला हवे. मात्र हे उद्यान केवळ सकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेतच उघडे ठेवले जात आहे. सुरक्षारक्षक नसल्याने झाडांना पाणी मारले जात नाही. तसेच उद्यानात सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून प्रेमी युगुले अश्लील चाळे करत बसलेले असतात. केडीएमसीच्या निवडणूकी दरम्यान इच्छुक उमेदवारांनी या उद्यानाची साफसफाई व खेळणी दुरूस्त करून घेतली होती.
गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाला लागून असलेल्या गटारात सांडपाणी जमा झाल्याचे दिसत आहे. त्यात डासांची अंडी आणि पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येत असल्याने उद्यानात येणारे बालगोपाळ आणि ज्येष्ठ नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील गटारे एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून बांधण्यात येत असून ती देखिल अर्धवट स्थितीत आहेत. गटारे बांधतांना येथील सांडपाणी वाहिन्या फुटल्याने त्यातील सांडपाणी पावसाळी गटारात जमा होत आहे. या संदर्भात एमआयडीसी व केडीएमसीचे स्थानिक रहिवासी असलेले उबाठाचे शाखाप्रमुख सागर पाटील, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, मंदार स्वर्गे यांनी लक्ष वेधूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. मंगळवारी २७ जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कमीतकमी जयंतीपूर्वी तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी धर्मवीर आनंद दिघे उद्यानाकडे लक्ष देतील का ? असा सवाल एमआयडीसीमधील रहिवासी करत आहेत.