

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा या प्रमुख जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत व यांत्रिक उपकरणांची तातडीने देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे.
या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे येत्या मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. कामाचा मोठा आवाका लक्षात घेता दिवसभरासाठी जलशुद्धीकरण प्रक्रिया थांबवण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामीण भागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, आटाळी आणि लगतच्या गावांचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसराचा पाणीपुरवठाही पूर्णपणे खंडित राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, आवश्यकतेनुसार आधीच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी केले आहे.