Dombivli News : हृदयद्रावकः खाऊ आणायला गेलेली जन्मदात्री तिन्ही चिमुरड्यांना रस्त्यावर सोडून बेपत्ता!

पश्चिम डोंबिवलीतील तुळशीराम बंगल्याजवळील घटनेने सारेच हैराण, विष्णूनगर पोलिसांकडून शोध सुरू
आईने सोडून दिलेल्या मुलांना परिसरातील महिलांनी आधार दिला.
आईने सोडून दिलेल्या मुलांना परिसरातील महिलांनी आधार दिला.
Published on
Updated on

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील तुळशीराम बंगल्याजवळ सोमवारी सकाळच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारा प्रकार उघडकीस आला. खाऊ आणायला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली आई आपल्या तीन लहान मुलांना रस्त्यावरच वाऱ्यावर सोडून बेपत्ता झाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन विष्णूनगर पोलिसांनी मुलांच्या बेपत्ता आईला शोधण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे.


    पश्चिमेकडे जुनी डोंबिवलीत असलेल्या तुळशीराम बंगल्याजवळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रडणाऱ्या आणि घाबरलेल्या अवस्थेत रस्त्यावर उभ्या असलेल्या या तीन चिमुरड्यांना तेथून जाणाऱ्या जयश्री यादव यांनी पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ या तिन्ही मुलांना आपल्या ताब्यात घेतले आणि थेट विष्णूनगर पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी या मुलांची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुले लहान असल्याने त्यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे या मुलांची नावे व वय अद्याप समजू शकली नाहीत. आईने असे टोकाचे पाऊल का उचलले ? यामागे कौटुंबिक वाद वा आर्थिक विवंचना आहे की अन्य काही कारण आहे ? याचा तपास पोलिस करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या तिन्ही मुलांना सद्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ

आईने जन्म दिलेल्या मुलांना भर रस्त्यावर सोडून दिल्याच्या घटनेनंतर जुन्या डोंबिवलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काळजावर दगड ठेवून तरी एखादी आई असे कसे करू शकते ? अशी चर्चा परिसरातील रहिवाशांमध्ये सुरू आहे. समयसूचकता दाखविणाऱ्या जयश्री यादव यांच्या माणुसकीचे परिसरातील रहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. या मुलांना किंवा त्यांच्या आईला कुणी ओळखत असल्यास त्वरित पोलिस विष्णूनगर ठाण्याशी 0251-2480102 किंवा नियंत्रण कक्षाशी 0251-2313427, 0251-2315446 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news