

Stolen Mobiles Recovered
डोंबिवली : कल्याण पोलिस परिमंडळ ३ अंतर्गत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून दाखल करण्यात आलेल्या मोबाईल गहाळ तक्रारींचा निपटारा करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून काढत कल्याणात बुधवारी पार पडलेल्या कार्यक्रमात नागरिकांना परत केले. या ७२ मोबाईल्सची जवळपास किंमत १२ लाखांच्या घरात आहे. हे सर्व मोबाईल पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले. नागरिकांनी या कामगिरीसाठी पोलिसांचे आभार मानले.
बाजार, रेल्वे स्टेशन परिसर, एसटी बस डेपो, तसेच गर्दीचा फायदा घेत चोरटे मोबाईल लांबवत असतात. तर काही जणांचे मोबाईल हरविल्याची तक्रारी कल्याणच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार २०२४ व २०२५ मध्ये कल्याण विभागातील खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरी व गहाळ झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी खास तांत्रिक पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी CEIR पोर्टलचा वापर करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डम डाट्यासह मोबाईल ट्रकींग मोहिम राबवली. या मोहिमेत पोलिस परिमंडळ ३ हद्दीतील कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले चौक, बाजारपेठ आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ११ लाख १८ हजार ७८० रूपयांच्या एकूण ७२ मोबाईलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. हे सर्व मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
७२ मोबाईल हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी मोबाईल हरविल्याची तक्रार दाखल करणाऱ्यांशी संपर्क साधून शहानिशा केल्या. बुधवारी खडकपाडा पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले. दरम्यान हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी कल्याण पोलिसांचे आभार मानले.