Dombivli MIDC Electricity Theft: डोंबिवलीत नाल्याच्या कामासाठी विजेची चोरी

ठेकेदाराकडून डीपी बॉक्समधून अनधिकृतपणे वापर; कारवाईकडे महावितरणचे दुर्लक्ष
Dombivli MIDC Electricity Theft
Dombivli MIDC Electricity TheftPudahri
Published on
Updated on

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये सध्या विजेचा गोंधळ सुरू असून कडक उन्हाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. अशातच एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नाले आणि गटारांच्या कामासाठी ठेकेदाराकडून बिनबोभाट वीज चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महावितरणच्या डीपी बॉक्समधून थेट वीज घेऊन इलेक्ट्रिक डीगर मशीन चालवली जात असून, याला महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप स्थानिक जागरूक रहिवाशांकडून केला जात आहे.

Dombivli MIDC Electricity Theft
Tarapur Worker Housing Crisis: तारापूरमधील लाखो कामगारांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर

एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून नवीन नाले आणि गटारींची कामे जोरात सुरू आहेत. रस्ता तोडण्यासाठी इलेक्ट्रिक डीगर मशीन वापरली जाते. या कामासाठी वीज आवश्यक असल्यास महावितरणकडून अधिकृत तात्पुरता वीज पुरवठा घ्यावा लागतो. त्यासाठी ठराविक शुल्क भरून विद्युत मीटर बसविणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार शॉर्टकट मारून अनधिकृतपणे अर्थात चोरीने वीज घेत असल्याचे दिसत आहे. गेले अनेक महिने हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

एमआयडीसीच्या निवासी विभागातील चार बिल्डिंग, गौरीनंदन सोसायटीजवळ सध्या नाल्याचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी दुपारी साडेचार ते सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणच्या डीपी बॉक्समधून अनधिकृतपणे वीज घेत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो एका जागरूक रहिवाशाने महावितरणच्या संबंधित अभियंता आणि अधिकाऱ्यांना पाठवले.

Dombivli MIDC Electricity Theft
Vasai Rain: वसईत मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी; रस्त्यावर,शेतात साचले पाणी

त्यावर अधिकाऱ्यांनी चेक करून सांगतो असा मेसेज पाठवला. मात्र त्यानंतर या प्रकरणी काय कारवाई केली ? किंवा हा वीजपुरवठा अधिकृत होता की अनधिकृत? महावितरणकडून माहिती देण्यात आली नाही. बुधवारी पुन्हा डीपी बॉक्समधून वीज घेतली जात असल्याचे दिसून आले आहे.

भीतीपोटी तक्रार नाही

विजेची चोरी करणाऱ्या व्यक्ती किंवा ठेकेदारांचे संबंध थेट राजकीय नेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याने सामान्य रहिवासी तक्रार करण्यास धजावत नसल्याची परिसरात चर्चा आहे. वीज आणि पाण्याच्या चोऱ्या, गळतीचे प्रमाण नगण्य झाले तर करदात्या रहिवाशांना कधीच तुटवडा भासणार नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हे अशक्यप्राय वाटते, अशी खंत या भागातील रहिवासी व्यक्त करत आहेत.

सामान्यांना भुर्दंड

एकीकडे सामान्य ग्राहकांचा वीजपुरवठा सतत खंडित होत असताना त्यात सुधारणा होताना दिसत नाही. विद्युत बिल वेळेवर न भरल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने वीज पुरवठा खंडित करतात. शिवाय वीज चोरी आणि इतर कारणांमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी सामान्य जनतेकडूनच वसुली केली जाते. अनधिकृत बांधकामे, टपऱ्यांनाही वीजपुरवठा दिला जातो. मात्र वीजचोरी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होताना दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news