

डोंबिवली : येथे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केल्यानंतर सर्व शाळांमध्ये अग्नी सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यासह विद्यार्थ्यांना आग प्रतिबंधक उपकरणांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता सौर ऊर्जा निर्मिती सुरू करून आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी शाळांना सूरक्षेसह स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असतानाच आता याच शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. डोंबिवलीच्या पाथर्ली रोडला असलेली आचार्य भिसे गुरुजी ही 62 क्रमांकाची शाळा आता पहिली सोलर शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते या शाळेतील सौरउर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
केडीएमसीच्या विद्युत विभागातर्फे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून सौर उर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहेत. याची सुरुवात पाथर्लीच्या आचार्य भिसे गुरुजी शाळेपासून करण्यात आली. या शाळेमध्ये चार किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी ही कल्याण-डोंबिवलीतील पहिली शाळा ठरली आहे. रविवारी केडीएमसी आयुक्त डॉ. जाखड यांच्या हस्ते हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. रिजन्सी निर्माण ग्रुपचे अनिल भतीजा यांनी केलेल्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
शाळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महत्त्व असून शाळा ही आपल्या सर्वांच्या अगदी जवळची गोष्ट आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शाळांची परिस्थिती आणि त्यांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही भर देत आहोत. ज्याचे दृश्य परिणाम येत्या वर्षापासून आपल्याला दिसू लागतील असे आयुक्त डॉ. जाखड यांनी यावेळी स्पष्ट केले. तर शाळा आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर काम करणे म्हणजे एकप्रकारे पुढची पिढी घडवण्याचे, देश घडविण्याचे काम आपण करत आहोत. आचार्य भिसे गुरूजी ही कल्याण-डोंबिवलीमधली पहिली सोलर शाळा झाली असल्याचे गौरवोद्गार आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी यावेळी काढले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उर्वरित 59 शाळांमध्येही लोकसहभागातून असे सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी उद्योजक, विकासक, आदींशी संपर्क साधला असून लवकर इतर सर्व शाळांवरही सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे सूतोवाच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले. या कार्यक्रमाला विकासक अनिल भतीजा, शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव, तात्या माने, नीलेश म्हात्रे, माजी नगरसेविका मंदा पाटील, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, रोटरी क्लबचे उमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.