

डोंबिवली: ट्रान्स्पोर्ट कंपनीमध्ये मित्रांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना 36 लाखांचा गंडा घालणारा आरोपी अखेर एका वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या पत्नीशी सुरू असलेल्या मोबाईलवरील संभाषणामुळे या आरोपीचा पोलिसांना मागमूस लागला. अखेर त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
ट्रान्स्पोर्ट कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट पैसे मिळतील, अशी थापेबाजी करून त्याने मित्रांना तब्बल 36 लाख रुपयांचा चुना लावला होता. पैसे घेऊन भूमिगत झालेल्या या गुन्हेगाराला अखेर एका वर्षानंतर अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीसोबत मोबाईलवर सुरू असलेल्या संभाषणामुळे डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी या भामट्याला अक्कलकोटमधून शोधून काढण्यात यश मिळविले आहे.
डोंबिवली परिसरात राहणाऱ्या या आरोपीने आपल्या तीन मित्रांकडून ट्रान्स्पोर्ट व्यवसायात गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवत तब्बल 36 लाख रुपये लाटले होते. पैसे उकळल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. याच दरम्यान त्याच्या पत्नीने तो हरवल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात नोंदविली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली. हा आरोपी फरार असताना देखील पत्नीच्या सतत संपर्कात होता. मित्रांचे पैसे परत कसे करायचे? या विवंचनेने ग्रासलेल्या या भामट्याने पसार होण्याचे नाटक केले. मात्र पत्नीशी तो अधूनमधून संपर्कात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याच्या मोबाईल क्रमांकावरून माग काढला असता तो अक्कलकोट येथे एका कंपनीत काम करत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या खास पथकाने सापळा रचून त्याला अक्कलकोटहून ताब्यात घेतले. आरोपीच्या विरोधात एक वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.