

डोंबिवली : घरगुती गॅसची गळती होऊन झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात पाच जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील नवनीत नगर गृहसंकुलात घडली. या दुर्घटनेत होरपळलेल्यांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. केतन देढिया (३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५), हरीश लोढाया (५०) आणि त्यांचा मुलगा पार्श्व लोढाया (७) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या दुर्घटनेत ज्या घरात स्फोट झाला त्या घराचे मालक केतन देढिया हे जवळपास ५० टक्के भाजल्याने त्यांना उपचारांसाठी सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित किरकोळ जखमींना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे.
घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान
डोंबिवली पूर्वेकडे देसलेपाडा परिसरात असलेल्या नवनीतनगर गृहसंकुलातील डब्ल्यू व्ही च्या ५१० नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणारे केतन देढिया (३५) यांच्या घरात सिलेंडरमधून गॅसची अचानक गळती सुरू झाली होती. मध्यरात्री बाराच्या सुमारास केतन हे जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांनी घरामध्ये लाईट चालू केली असता सिलेंडरमधून गळती झालेल्या गॅसमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये केतन देडिया गंभीर जखमी होऊन त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या स्फोटामुळे त्यांच्या शेजारी राहणारे मेहुल वासाड आणि विजय घोर हे देखील किरकोळ जखमी होऊन त्यांच्याही घराचे नुकसान झाले. त्याचबरोबर केतनदेवी यांच्या घराची खिडकी आणि ग्रील तुटून इमारतीच्या तळाला कोसळली. यावेळी इमारतीच्या तळमजल्यावर राहणारे हरीश लोढाया आणि त्यांचा लहान मुलगा पार्श्व हे दोघे बाप-लेक इमारतीच्या आवारात फिरत होते. त्यांच्या अंगावर खिडकीच्या काचा पडल्या. त्यात दोघे बाप-लेक किरकोळ जखमी झाले.
सर्व जखमींना सोसायटीतील अन्य रहिवाशांनी जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. या स्फोटात केतन देडिया हे जवळपास ५० टक्के भाजल्याने त्यांच्यावर प्रथम खासगी रूग्णालयात दाखल झाले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सायनच्या लोकमान्य टिळक रूग्णालयात हलविण्यात आले. तर उर्वरित चार जखमींवर औषधोपचार करून घरी सोडून देण्यात आले.
शक्तिशाली स्फोट
दरम्यान, स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. सुरूवातीला काय झाले हे समजत नव्हते. इमारतीच्या आवारात रहिवाशांची मोठी गर्दी जमली होती. स्फोट इतका शक्तिशाली होता की ज्यामुळे केतन देढिया यांच्या घरातील खडकीचे ग्रील आणि दरवाजे वाकून सामानाचे देखील मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या जवानांसह मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.