

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून फेसयुक्त आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याचा संशय व्यक्त होत असून, त्यामुळे त्वचारोगांसह पाण्याद्वारे पसरणाऱ्या विविध आजारांचा धोका वाढला आहे. सोमवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील गळती बंद केली असली तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता महापालिकेने घ्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते अनमोल म्हात्रे यांनी ‘ह’ प्रभागाच्या पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले होते. त्यांनी तातडीने पत्र पाठवून प्रभाग क्रमांक ५१ मध्ये गढूळ आणि फेसयुक्त पाणी येत असल्याची तक्रार केली होती. या भागातील श्री शारदा सोसायटी, सद्गुरू सोसायटी, अंबर पार्क, अष्टगंधा सोसायटी, अनमोल नगरी आणि गरीबाचा वाडा परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अशा दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे.
महापालिका अधिकार्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार केली असता सोमवारी (28 जुलै) दुपारी अधिकारी आणि कर्मचारी स्वतः श्रीधर म्हात्रे चौकात आले. मेन लाईन मध्ये असलेलं लिकेज आमच्या समोर कायमच बंद केलं आहे.
स्थानिक नागरिक
विशेष म्हणजे, श्री शारदा सोसायटीने या महिन्यात तीन वेळा केडीएमसीकडे दूषित पाण्याबाबत तक्रार केली. १४ आणि २४ जुलै रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती. २४ जुलै रोजी महापालिकेचे कर्मचारी सोसायटीत येऊन पाहणी करून गेले. त्यांनी मुख्य जलवाहिनीतूनच दूषित पाणी येत असल्याची खात्री दिली. मात्र, दोन दिवसांनी पुन्हा एकदा फेसयुक्त आणि गढूळ पाणी नळांमधून येऊ लागले. यापूर्वी तीनदा पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या असून, आता चौथ्यांदा टाक्या स्वच्छ कराव्या लागत आहेत. वारंवार अशा दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
दूषित पाण्यामुळे त्वचारोग, पोटदुखी, उलटी, जुलाब, टायफॉईड, हिपॅटायटिस यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रहिवाशांनी केडीएमसीकडे वारंवार तक्रारी करण्यात आली आहे. सोमवारी आता परिसरातील जलवाहिन्यांची तपासणी करून दूषित पाण्याचा स्रोत शोधून काढावा, तसेच जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र तपासणी समिती नेमावी, अशीही मागणी होत आहे.
सध्या डोंबिवलीतील अनेक भागांत पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केडीएमसी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी अपेक्षा त्रस्त रहिवाशांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.