Dombivli FDA Raid : डोंबिवलीत एफडीएचा मोठा दणका, सांगलीहून आलेले ५०० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट!

विक्रेत्याकडे परवानाच नाही : ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Dombivli FDA Raid
Dombivli FDA Raid
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. सांगलीहून डोंबिवलीत वितरणासाठी आलेले जवळपास ५०० लिटर भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करून टाकले आहे. डोंबिवली पश्चिमेतील भोईर वाडी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोर विक्रेत्याकडे परवानाच नसल्याचे चौकशीतून उघडकीस आले आहे.

      या संदर्भात अधिक माहिती देताना एफडीएचे अधिकारी राजेंद्र कर्डक यांनी सांगितले की, सांगलीहून डोंबिवलीत विक्रीसाठी आणलेले सुमारे ५०० लिटर दूध तपासणीदरम्यान भेसळयुक्त असल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे हे दूध विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे कोणत्याही प्रकारचा परवाना देखील नव्हता, असा दावा अधिकारी राजेंद्र यांनी केला. कोणतीही परवानगी नसताना आणि भेसळयुक्त दूध थेट ग्राहकांच्या माथी मारण्याचा हा संतापजनक प्रकार एफडीएचे अधिकारी राजेंद्र कर्डक यांनी उघडकीस आणला आहे.

हे भेसळयुक्त दूध कल्याण-डोंबिवलीतील विविध डेअऱ्यांच्या माध्यमातून ग्राहकांना विकले जाणार होते, अशी धक्कादायक माहिती देखील तपासात समोर आली आहे. सणासुदीच्या काळात दूध आणि दुधाच्या पदार्थांची मागणी वाढत असताना अशा पद्धतीने भेसळयुक्त दूध बाजारात आणून ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर टोळीचा पर्दाफाश झाल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 दोषींवर कठोर कारवाई होणार

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास अन्न व औषध विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या भेसळयुक्त दूध प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? हे दूध कुठून आणले जात होते ? कल्याण-डोंबिवलीतील कोणत्या डेअऱ्यांमध्ये ते विकले जाणार होते ? याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news