

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या केळकर रोडला शुक्रवारी सकाळी एक वृध्द महिला रस्ता ओलांडत होती. इतक्यात डोंबिवली एमआयडीसीतील एका खासगी शाळेची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस तेथून जात होती. या बसच्या मागच्या चाकाखाली येऊन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला.
या महिलेला पादचाऱ्यांनी तात्काळ रामनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी शाळेच्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. सुप्रिया मराठे (६८) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या पती सोबत रामनगर भागातील उर्सेकरवाडी भागात राहत होत्या. शुक्रवारी सकाळी सुप्रिया मराठे बाजारात खरेदीसाठी बाहेर पडल्या होत्या. रस्ता ओलांडत असताना एम एच ०५/ए झेड/०९६६ क्रमांकाच्या बसच्या मागच्या चाकाखाली आल्या. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ उर्सेकरवाडीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
मोठागाव-माणकोली पूल सुरू झाल्यापासून आता पंडित दिनदयाळ रोड, केळकर रोडवरील वाहनांचा भार वाढला आहे. केळकर रस्त्यावरील अरूंद जागेत तीन रांगांमध्ये वाहनतळावर रिक्षा उभ्या असतात. या रस्त्याच्या एका मार्गिकेतूनअवजड वाहने, बस, खासगी वाहने ये-जा करतात. हा रस्ता रूंद झाला असता तर आता होणारी कोंडी, अपघात टळले असते अशी चर्चा आता नागरिक करत आहेत.