Dombivli doctor assault case : डोंबिवलीच्या रुग्णालयातील हल्ल्यावेळी मारहाण झालेल्या दोघा डॉक्टरांचे राजीनामे

डॉक्टरांचा ठाणे सोडण्याचा निर्णय; कर्मचारी अजूनही तणावाखाली
Dombivli municipal hospital Doctor Beaten by Shiv Sena Corporator Ramesh Mhatre
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य उपक्रमातील डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी डॉक्टर व नर्सेसना मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर मारहाण झालेल्या दोन डॉक्टरांनी तातडीने राजीनामा दिला आहे. सोबतच, त्यांनी ठाणे सोडण्याचा विचार चालवला असून, रुग्णालयातील कर्मचारी अजूनही तणावाखाली आहेत.

डॉ. वैभव साळुंखे आणि डॉ. सृष्टी बाविस्कर अशी या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांनी राजीनामा देऊन निषेध व्यक्त केला आहे. डाॅ. साळुंके गेल्या चार महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. डाॅ. बाविस्कर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घडलेला प्रकार धक्कादायक होता, असे या दोन्ही डाॅक्टरांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे कर्मचारी अजूनही तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे.

आम्ही ठाणेही सोडणार : डॉक्टर भावनावश

मारहाण झालेले डॉक्टर भावनावश झाल्याचे चित्र समोर आले आहे. आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही ठाणेही सोडणार, अशी भावनिक प्रतिक्रिया दोन्ही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. तसेच, आम्हाला पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर आंदोलनकर्ते पुन्हा सेवेत रुजू

डॉक्टरांसह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीनंतर सुरू असलेले आंदोलन अखेर गुरुवारी मागे घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेसह चार आरोपींना अटक झाल्यानंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयातील सेवा सुरू झाल्या असल्या तरी शास्त्रीनगर रुग्णालय परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयात पोलिस बंदोबस्त आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

म्हात्रेंना वाचवण्यासाठी वैद्यकीय अहवालाचा घोळ

याप्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रकृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रक्रियेवर आता संशयाचे धुके दाटले आहे. अटकेनंतर म्हात्रे यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांकडून म्हात्रे यांच्या आरोग्याबाबतचे कोणतेही ठोस मेडिकल सर्टिफिकेट देण्यास कमालीची टाळाटाळ केली जात आहे. जोपर्यंत अधिकृत मेडिकल रिपोर्ट समोर येत नाही तोपर्यंत पोलिसांना पुढील कायदेशीर पावले उचलता येत नाहीत. त्यामुळे पोलिसही गोंधळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news