

डोंबिवली : डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या दोघा डॉक्टरांसह महिला परिचारिकांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चौघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कल्याण सत्र न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे साथीदार रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या चौघांना १४ जुलै अर्थात सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवारी कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल क्रमांक ६ मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी चौघेही आरोपी न्यायालयात हजर होते. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. ए. पी. आडसकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, हा हल्ला सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला इजा करणे आणि रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रकार आहे. तपासासाठी आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साथीदारांचा शोध घेणे आवश्यक असल्याने सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बचाव पक्षातर्फे रमेश म्हात्रे यांचे वकील ॲड. अजित पत्की यांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यांनी म्हात्रेंचे आजारपण आणि त्यांच्या व्याधींची माहिती न्यायालयाला दिली, तसेच त्यांना कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या वतीने पोलीस अभियोक्त्यांनी रमेश म्हात्रे यांची चौकशी करण्यासाठी पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्याला प्रतिवादी पक्षाने हरकत घेऊन कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून रमेश म्हात्रेंसह चौघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीत असताना रमेश म्हात्रे यांना काही शारीरिक त्रास झाला, तर त्यांच्या आजारानुसार त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार तातडीने देण्याच्या सूचना न्यायालयाने पोलिसांना दिल्या.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले रमेश म्हात्रे यांना जामिनावर सोडण्याची त्यांच्या वकिलांची मागणी न्यायालयाने फेटाळली. सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांनी चौघांनाही १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादातून आरोपींनी रुग्णालयात घुसून सरकारी कामात अडथळा आणला, तसेच पुरुष आणि महिला डॉक्टरांसह परिचारिकांना मारहाण केली. विष्णूनगर पोलिसांनी फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३२, १२१(१), १८९(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२) सह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१० चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही सर्व कलमे अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत. या कलमांचे स्वरूप पाहता आरोपींना लवकर जामीन मंजूर करणे कठीण जाईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आरोपींच्या अटकेनंतर केडीएमसीच्या डॉक्टर आणि परिचारिकांसह वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन तातडीने मागे घेतले. त्यामुळे कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर या महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा कडेकोट पोलिस बंदोबस्तात पूर्ववत सुरू झाली आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि त्यांचे तपास पथक आता घटनास्थळाचा पंचनामा, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अधिक तपास करत आहेत.
मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केल्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सुनावणी सुरू होण्याआधी आणि सुनावणीनंतर परिसरात म्हात्रे यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. न्यायालयाच्या गेटपासून ते कोर्ट हॉलपर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. अचानक वाढलेली गर्दी आणि तणावाचे वातावरण पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख नियोजन केले होते.
न्यायालय आणि परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्दीतील तसेच साध्या वेशातील पुरुष व महिला कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तैनात होते. कोर्ट हॉल क्रमांक ६ च्या बाहेर आणि आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह नागरिकांचीही मोठी गर्दी होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून सुनावणी शांततेत पार पडेल याची दक्षता घेतली. आरोपींना आणताना आणि नेताना पोलिसांनी मानवी साखळी करून सुरक्षेची खबरदारी घेतली होती. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पडले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.