

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी विष्णूनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपी, शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक केली. ही माहिती कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता, कोर्टाने यातील तिघा अटक आरोपींना अधिक चौकशीसाठी १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे खासगी अंगरक्षक असलेले रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश ऊर्फ प्रकाश उद्धव निकम (३५) आणि अक्षय शरद कारंडे (३०) या तिघांना पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
रुग्णालयात येऊन रमेश म्हात्रे यांनी प्रथम डॉक्टरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि डॉ. वैभव साळुंखे, डॉ. सृष्टी बाविस्कर यांना मारहाण केली; तसेच दोन परिचारिकांना अरेरावीची भाषा केली होती. म्हात्रे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असतानाही मोकाट फिरत होते आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत असल्याने वैद्यकीय संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील विविध वैद्यकीय संस्थांमधील खासगी डॉक्टरांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला व पुरुष डॉक्टरांसोबत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेल्या गैरकृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. "शासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन या नगरसेवकावर कठोर कारवाई करावी," अशी प्रतिक्रिया राज्यभरातील डॉक्टर, जाणकार नागरिक, वकील मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उमटत होती. दरम्यान, केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना ही घटना घडल्याने, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत लोकलने डोंबिवलीत आले. शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. "बुधवारी संध्याकाळपर्यंत पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक करावी, अन्यथा गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे रुग्णालयात आंदोलन केले जाईल," असा इशारा आमदार पवार यांनी दिला.
पालिकेच्या रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, उबाठा गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयाला भेट दिली. "आम्ही तुमच्यासोबत आहोत," असा विश्वास देतानाच, "ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही," असेही त्यांनी सांगितले. "माझ्या भेटीनंतर लगेच रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली. मात्र केवळ अटक करून चालणार नाही, तर त्याची धिंड काढली पाहिजे आणि त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे," अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली.
"रुग्णसेवा देणाऱ्यांना असे नगरसेवक मारहाण करत असतील, तर ते त्यांच्या विकृतीचे प्रदर्शन करतात. पोलिसांनी अशांची कपडे काढून धिंड काढली पाहिजे. या नगरसेवकाच्या पक्षाच्या नेत्यांनी गंभीर दखल घेऊन त्याचे नगरसेवक पद रद्द करावे," अशी मागणी त्यांनी केली. यामुळे पोलिसांवर अटकेसाठी दबाव वाढला होता.
दुसरीकडे, शिंदे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, "मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी आहे. या प्रकरणाचे शिवसेना कोणत्याही प्रकारे समर्थन करणार नाही. हा गुन्हा करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल," असे जाहीर केले. म्हात्रे यांना शिंदे शिवसेनेने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. नगरसेवक म्हात्रे यांच्या अटकेसाठी राज्यभरातून दबाव वाढत होता, अखेर बुधवारी संध्याकाळी रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली.