Dombivali Crime : 'वीज मीटरमध्ये बिघाड' सांगून कल्याणमध्ये महिलेला लुबाडले, महावितरणच्या नावाने 3 लाखांची फसवणूक

दोन भामट्यांविरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल
Dombivali Crime : 'वीज मीटरमध्ये बिघाड' सांगून कल्याणमध्ये महिलेला लुबाडले, महावितरणच्या नावाने 3 लाखांची फसवणूक
Published on
Updated on

डोंबिवली : सर्वसामान्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुटण्याचे नवनवे फंडे भामटे शोधून काढत आहेत. कल्याणमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, घरातील वीज मीटरमध्ये बिघाड असल्याचे सांगून एका गृहिणीला चक्क ३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. "महावितरणच्या कारवाईपासून वाचवतो" असे सांगून दोन तोतया इलेक्ट्रिशियन्सनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

नेमका प्रकार काय?

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावातील 'दीपक पॅराडाईज' सोसायटीत राहणाऱ्या स्नेहा सुरेश निपुर्ते (५५) यांच्याकडे मे २०२३ च्या दरम्यान शशिकांत शेलार आणि नितीन ठाणेकर नावाचे दोन इसम आले. त्यांनी स्नेहा यांना त्यांच्या घरातील वीज मीटरमध्ये गंभीर बिघाड असल्याचे सांगितले.

'कारवाईची भीती' दाखवून उकळले लाखो रुपये

भामट्यांनी स्नेहा यांना घाबरवले की, या बिघाडामुळे महावितरण त्यांच्यावर मोठी कायदेशीर कारवाई करू शकते. या कारवाईतून सुटका हवी असेल, तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना 'मॅनेज' करावे लागेल, अशी थाप त्यांनी मारली. घाबरलेल्या निपुर्ते कुटुंबाने कारवाई टाळण्यासाठी या दोघांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुलामार्फत वेळोवेळी एकूण ३ लाख १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.

असा फुटला फसवणुकीचा घडा

काही दिवसांनी स्नेहा यांना महावितरणकडून एक अधिकृत नोटीस आली. तेव्हा या भामट्यांनी पुन्हा मदतीचा बनाव करून दंडाची खरी रक्कम भरली खरी, मात्र त्या बदल्यात स्नेहा यांच्याकडून लाटलेली रक्कम दंडाच्या रकमेपेक्षा कित्येक पटीने जास्त होती. कालांतराने संशय आल्यावर स्नेहा यांनी चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांची कारवाई आणि आवाहन

स्नेहा निपुर्ते यांच्या फिर्यादीनुसार, खडकपाडा पोलिसांनी शशिकांत शेलार आणि नितीन ठाणेकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नसून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड अधिक तपास करत आहेत.

"नागरिकांनी सावध राहावे!"

"कोणीही व्यक्ती घरी येऊन कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता थेट महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांना कळवावे. कोणाच्याही बँक खात्यावर परस्पर पैसे पाठवू नयेत," असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news