

डोंबिवली : जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या खास पथकाने कारवाई केली. यामध्ये संघटीत गुन्हे करणाऱ्या १४ आरोपींचे पेकाट मोडून काढण्यासाठी मोक्का कायद्याचा प्रभावीपणे वापर करून आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करांच्या या टोळीचा कणा खिळखिळा करून टाकला आहे.
सरत्या वर्षामध्ये जिल्ह्यातील मोक्का कायद्यान्वये केलेली ही दुसरी कारवाई मानली जाते. अटक करण्यात आलेल्या या सातही तस्करांकडून ८ लाख ८५ हजार रूपये किंमतीचा ३५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा, ५० हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वायरलेली कार असा एकूण १६ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मोहम्मद सोहेल उर्फ भुन्या मोहम्मद रफिक शेख (२४, रा. नागसेन-१, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर, नागपूर), फैजान इस्माईल शेख (२४, रा. बड़ा ताजबाग, सिधोवध झोपडपट्टी, नागपूर), समीर अली साकीर अली (२४, रा. बडा ताजबाग, उंब्रज रोड, नागपूर), आसिफ निजाम सय्यद (२५, रा. विजय भवानी नगर, झोपडपट्टी, नागपूर) या चौघांनी अंमली पदार्थ तस्करीचे जाळे पसरले होते. या चौकडीची कस्सून चौकशी केली असता आणखी तिघा बदमाशांची नावे उघड झाली. त्यानुसार पथकाने भिवंडी, नागपूर आणि ओरिसा राज्यातून शाहीद अब्दुलगणी शेख (३६, वर्षे, रा. पॅन्टाकॉन, चावींद्रा रोड, भिवंडी), शाहिद शेख उर्फ बाबा उर्फ चाटू युनूस शेख (३६, वर्षे, रा. यशोदिप कॉलनी, महेंद्र नगर, पाचपावली, नागपूर), रविंद्र सुशांत मिर्धा (३८, रा. मु. पो. डिमीरी मुंडा, किशोरनगर, किशोरननगर, जि. अंगुल, ओरीसा राज्य) अशा तिघांच्या मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना जिल्हा न्यायाधिश - १ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश आणि ठाण्याच्या विशेष मोक्का न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या सातही आरोपींना अधिक चौकशीसाठी २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी दुपारच्या सुमारास निळ्या रंगाच्या बलेनो कारमधून तीन ते चार इसम गांज्याचा साठा विक्रीसाठी कल्याण पश्चिमेकडील मुरबाड रोडला असलेल्या सुभाष चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोनि विजय नाईक, पोउपनि विकास मडके, हवा. महेंद्र मंझा, हवा. धेरे, कल्याण शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे आणि त्यांचे सहकारी पोशि सोनवणे, आदींच्या पथकाने वालधुनी पूल परिसरात जाळे पसरले.
दुपारपासून सायंकाळी ५ पर्यंत पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. इतक्यात सावज टप्प्यात येताच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशनकडे भरधाव वेगात जाणाऱ्या छत्तीसगड ०८ /ए एम /९४०१ क्रमांकाच्या सुझुकी बलेनो कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने ही कार भरधाव वेगात चालवून वर्दीवर असलेल्या पोलिस शिपाई सोनवणे यांच्या अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातून पोशि सोनवणे थोडक्यात बचावले. पोलिसांच्या पथकाने आक्रमक पावित्र्याने थरारक पाठलाग करत कारला काही किमी अंतरावर रोखले.
झडती घेतली असता या कारमध्ये ३५ किलो ४०० ग्रॅम वजनाच्या गांज्यासह एक गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी आतापर्यंत या सातही तस्करांकडून ८ लाख ८५ हजार रूपये किंमतीचा ३५ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा, गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रूपये किंमतीची लोखंडी मॅगझीन असलेली गावठी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत राऊंड (काडतुसे), ७ लाख रूपये किंमतीची सुझुकी बलेनो कार असा एकूण १६ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
एनडीपीएस अन्वये ४० हून अधिक गुन्ह्यांची मालिका
सखोल चौकशी केली असता या टोळीच्या विरोधात नागपूर शहर आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ४० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच फरार आरोपी आणि त्यांच्या साथीदारांनी संघटीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी ओरिसा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची खरेदी आणि वाहतूक करुन महाराष्ट्रात नागपूर, ठाणे, मुंबई, नाशिक, आदी शहरांत विक्री करत असल्याचे व त्यांची आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अटक केलेल्या आणि हव्या असलेल्या चौदाही आरोपींच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून केली पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. कल्याणजी घेटे करत आहेत.