

डोंबिवली : शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला लज्जास्पद वाटेल अशी घटना उघडकीस आली आहे. एका असहाय्य आणि अनाथ तरुणीला मदतीचे आमिष दाखवून तिच्याच एका कथित मित्राने तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
पीडित तरुणी डोंबिवलीत एका खाजगी ठिकाणी नोकरी करते. अनाथ असलेल्या या तरुणीला काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली होती. या अन्यायाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी तिला कोणाच्या तरी आधाराची गरज होती. याच काळात तिची स्नॅपचॅट या समाज माध्यमावर क्रिश भोईर (वय २२, रा. निळजे गाव) याच्याशी ओळख झाली होती.
पोलिस तक्रार करण्यासाठी मदत हवी असल्यामुळे तरुणीने क्रिशला बोलावून घेतले. क्रिशने तिला पोलीस ठाण्यात नेण्याचे आश्वासन दिले, मात्र मदतीऐवजी त्याच्या मनात विकृती शिजत होती. रविवारी (दि. २६) रात्री त्याने तरुणीला पोलिस ठाण्यात न नेता एका निर्जन स्थळी नेले आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
इतक्यावरच हा नराधम थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या गुगल-पे वरून स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. तिच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून घेतले. तिचा मोबाईल हिसकावून घेत तिथून पोबारा केला.
घडलेल्या प्रकारानंतर पीडित तरुणीने धीर न सोडता सोमवारी (दि. २७) सकाळी मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या काही तासांतच तांत्रिक तपासाच्या आधारे क्रिश भोईर याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश भोईर याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर तरुणींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला असण्याची शक्यता आहे. पोलीस आता त्या दिशेने कसून तपास करत आहेत. सध्या कल्याण न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.