डोंबिवली : डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून घरात प्रवेश करून पाणी मागण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास करून पसार झालेल्या चोरट्याला विष्णूनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करून दणका दिला आहे. प्रवीण गणेश बोचरे (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पश्चिम डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत आरोपी प्रवीण बोचरे हा डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवत एका घरात शिरला. घरात प्रवेश केल्यानंतर त्याने मला दम लागला आहे, पाणी मिळेल का ? असे सांगत घरातील व्यक्तीला पाणी आणण्यासाठी पाठवले. घरातील व्यक्ती पाणी आणण्यासाठी आत जाताच घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने बॅगेत ठेवलेली सोन्याची चेन चोरली आणि तेथून पळ काढला.
काही वेळाने घरातील वस्तू तपासल्यानंतर साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याचे संबंधित व्यक्तीच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने विष्णूनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि अवघ्या १२ तासांत त्याला अटक केली.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, संजय निकुळे आणि शांताराम कसबे यांनी केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अटक केलेल्या चोरट्याला गुरूवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान प्रवीण बोचरे याच्याविरूद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१९ मध्ये त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४ आणि ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.