Dombivli Crime : डोंबिवलीतील दुचाकी जळीतकांडाला कलाटणी! इमारतीतील ‘तो’ तरुणच निघाला 'व्हिलन', CCTV कॅमेऱ्यात कैद

Dombivli crime news : आग शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर 'मानवनिर्मित'
Dombivli crime news bike burning case
Published on
Updated on

Dombivli crime news bike burning case

डोंबिवली : डोंबिवलीतील सांगाव परिसरात रविवारी (दि. १५) पहाटे घडलेल्या भीषण दुचाकी जळीतकांडाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. ज्या आगीने २९ दुचाकींचा कोळसा झाला आणि अनेक निष्पापांचे जीव धोक्यात घातले, ती आग शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर 'मानवनिर्मित' असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याच इमारतीत राहणाऱ्या लवेश पार्टे (वय २२) या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

सीसीटीव्हीचा पुरावा

रविवारी पहाटे ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जेव्हा संपूर्ण 'राज अपार्टमेंट' गाढ झोपेत होते, तेव्हा लवेश पार्टे घराबाहेर पडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, लवेशने पार्किंगमधील कचरा पेटीत एक संशयास्पद वस्तू टाकली. ती वस्तू टाकताच काही सेकंदात आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की पाहता पाहता पार्किंगमधील २९ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

इमारतीत हाहाकार; ५ रहिवासी जखमी

आगीच्या ज्वाळा आणि गुदमरून टाकणाऱ्या धुरामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत रहिवाशांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते.

पोलिस कोठडी आणि अनुत्तरित प्रश्न

मानपाडा पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लवेशला तत्काळ अटक केली. मंगळवारी (दि. १७) त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, या अटकेनंतर लवेशने कचरा पेटीत नक्की काय टाकले होते? हे कृत्य त्याने सूडबुद्धीतून केले की केवळ विकृत आनंदासाठी? इमारतीतील रहिवाशांशी त्याचे काही वैर होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद होत्या. संशयीत आरोपीने पार्किंगमध्ये ज्वलनशील वस्तू टाकल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास आम्ही करत आहोत.’

तपास अधिकारी, मानपाडा पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news