

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे मलंगगड रोडवर असलेल्या ढाब्याजवळील अंजनाबाई भाने उद्यानाबाहेर २८ वर्षीय अर्जुन गजानन काळपांडे याची पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. प्रकरणातील अटक केलेल्या सहा आरोपींना शुक्रवारी दुपारी मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी आणून त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १६ जुलैच्या रात्री कल्याण-मलंगगड रोडवरील 'काकाचा ढाबा'जवळील अंजनाबाई भाने उद्यानाबाहेर पूर्ववैमनस्यातून सशस्त्र टोळक्याने अर्जुन उर्फ पेंद्या गजानन काळपांडे (२८) याच्यावर चाकूने तब्बल १६ वार करून त्याला जागीच ठार केले होते. कल्याण पूर्वेकडील चक्की नाक्यावर असलेल्या गोसावी पुऱ्यातील गजानन काळपांडे चाळीत अर्जुन राहत होता. हा हल्ला रोखायला गेलेली त्याची मैत्रीण स्नेहा पाणीग्रही हिच्यावरही हल्लेखोरांनी चाकूने वार केले.
या गुन्ह्यातील अविनाश लल्लन झा, कल्पेश ज्ञानेश्वर मडवी, करण भरत गायकवाड, लकी सुनील माळी, गौरव राजू बोंबे आणि रवी सूर्यकांत लगाडे या सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मानपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व आरोपींना घटनास्थळी नेले. तेथे पोलिसांनी आरोपींकडून हल्ला नेमका कसा झाला? कोणी कोणावर वार केले? शस्त्रे कुठे फेकली? पळून जाताना कोणत्या रस्त्याने गेले? याची सविस्तर माहिती घेतली. आरोपींच्या जबाबाची घटनास्थळावरील पुराव्यांशी जुळवाजुळव करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
घटनास्थळी आरोपींना घेऊन केलेल्या या तपासामुळे प्रकरणातील अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट झाले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत. जुन्या वादातून झालेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली होती; मात्र पोलिसांनी झटपट कारवाई करून सर्व आरोपींना गजाआड केल्याने परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.