Dombivli Fraud | फ्लेमिंगो अभयारण्याच्या ठेकेदाराकडून व्यावसायिकाला ५१.६२ लाखांचा गंडा, पैसे मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी

पैसे परत मागितल्यावर ठेकेदाराने वरपर्यंत ओळख असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू
Crime News
Crime News
Published on
Updated on

Dombivli Death Threat News

डोंबिवली : नवी मुंबईतील ऐरोली वनपरिक्षेत्रांतर्गत ठाणे खाडी किनारी उभारण्यात येणाऱ्या फ्लेमिंगो अभयारण्याच्या कामासाठी बांधकाम साहित्य पुरविलेल्या डोंबिवलीतील एका व्यावसायिक दाम्पत्याची सरकारी ठेकेदाराने ५१ लाख ६२ हजार ७९४ रुपयांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यावर ठेकेदाराने वरपर्यंत ओळख असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

वासुमिया अलिखान इनामदार (वय ६०) असे तक्रारदाराचे नाव असून ते कल्याण-शिळ महामार्गावरील कासाबेला, पलावा गृहसंकुलात राहणारे आहेत. डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या लोढा संकुलात कादिर आणि अमरिन ट्रान्सपोर्ट या नावाने बांधकाम साहित्याचे दुकान चालवतात. तर अंकित बापू ठोंबरे (४०, रा. शंकेश्वरनगर, सांगाव, डोंबिवली) असे फसवणूक करणाऱ्या सरकारी ठेकेदाराचे नाव आहे.

Crime News
Dombivli Crime | डोंबिवलीतील तरूणीच्या मृत्यूचा उलगडा: तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न, प्रियकराला बेड्या

या संदर्भात वासुमिया इनामदार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत अंकित ठोंबरे आणि त्यांचे भागीदार जुबेर कुरेशी यांनी फ्लेमिंगो अभयारण्याच्या कामासाठी इनामदार यांच्या दुकानातून लोखंडी सळ्या आणि इतर बांधकाम साहित्य खरेदी केले. या साहित्याची एकूण किंमत ३५ लाख ५२ हजार ७९४ रूपये होती. त्यापैकी ठोंबरे यांनी फक्त ७ लाख रूपये दिले. उर्वरित २८ लाख ५२ हजार ७९४ रूपये देणे बाकी राहिले.

त्यानंतर ठोंबरे यांनी इनामदार यांच्या पत्नीला सांगितले की, त्यांचे शासकीय देयक अडकले आहे आणि ते सोडविण्यासाठी बाबू लोकांना २० लाख रूपये द्यावे लागतील. त्यासाठी आणखी पैसे देण्याची मागणी केली. यावर विश्वास ठेवून इनामदार यांच्या पत्नीने एचडीएफसी बँकेतून स्वतःच्या नावावर १७ लाख ४० हजार रूपयांचे कर्ज काढून ती रक्कम अंकित ठोंबरे यांच्या बँक खात्यावर जमा केली. ठोंबरे यांनी यापैकी केवळ २ लाख १० हजार रूपये परत केले. कर्जाचे हप्ते सुरू झाल्याने वासुमिया इनामदार यांच्या पत्नीने वारंवार पैसे मागितले असता अंकित ठोंबरे टाळाटाळ करू लागले.

Crime News
Dombivli crime : इराणी काबिल्यात पोलिसांचा पहाटे ‘सर्जिकल स्ट्राईक’!

अशा प्रकारे इनामदार यांच्या पत्नीच्या कर्जाऊ रकमेचे व्याजासह २३ लाख १० हजार रूपये आणि दुकानातील बांधकाम साहित्याचे २८ लाख ५२ हजार ७९४ रूपये असे एकूण ५१ लाख ६२ हजार ७९४ रूपयांचा अपहार आणि फसवणूक अंकित ठोंबरे यांनी केल्याचा आरोप आहे. हे पैसे मागितल्यावर ठोंबरे यांनी इनामदार यांना फोन करून माझ्याकडे सारखे पैसे मागू नका, माझी वरपर्यंत ओळख आहे, सारखा फोन केल्यास तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकी दिली. या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी अंकित ठोंबरे आणि जुबेर कुरेशी यांच्याविरूद्ध फसवणूक आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सरकारी प्रकल्पांच्या नावाने फसवणुकीचे तंत्र

ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यासारख्या मोठ्या सरकारी प्रकल्पांच्या नावाने ठेकेदारांकडून साहित्य खरेदी करून पैसे न देण्याचे प्रकार वाढले आहेत. सरकारी देयके अडकली आहेत, वरपर्यंत ओळख आहे असे सांगून व्यापाऱ्यांकडून कर्जाऊ पैसे उकळण्याचा हा नवा पायंडा पडत आहे. बांधकाम साहित्य पुरवठादारांनी अशा प्रकरणांमध्ये सतर्क राहून लेखी व्यवहार आणि आगाऊ पेमेंटची मागणी करावी, असे आवाहन व्यावसायिक संघटनांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news