Dombivali Accident : डोंबिवलीत भरधाव रिक्षाच्या धडकेत मुंबई पोलिस जायबंदी!

स्थानक परिसरातील स्कायवॉकखाली घडली घटना, फरार रिक्षा चालकाचा रामनगर पोलिसांकडून शोध सुरू 
Dombivali Accident : डोंबिवलीत भरधाव रिक्षाच्या धडकेत मुंबई पोलिस जायबंदी!
Dombivali Accident : डोंबिवलीत भरधाव रिक्षाच्या धडकेत मुंबई पोलिस जायबंदी!
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात भरधाव वेगात असलेल्या रिक्षाच्या धडकेत एक पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. पाटकर रस्त्यावरील स्कायवॉक खालील रस्त्यावर रविवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना आता समोर आली असून जखमी पोलिसावर एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोपाळ गोरखनाथ मांडवे (४४) असे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव असून ते मुंबई पोलिस आयुक्तालयातील भांडुप पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. धडक देणारा रिक्षाचालक फरार झाला आहे.

    या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ मांडवे हे डोंबिवलीतील स्टार कॉलनीमधील एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ते दररोज सकाळी आपल्या दुचाकीने रेल्वे स्थानक परिसरात येऊन वाहनतळावर दुचाकी लावून लोकलने मुंबईकडे कर्तव्यावर जातात. घटनेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ते ड्युटी संपवून घरी परतत असताना पाटकर रस्त्यावरील स्कायवॉक खालील रस्त्याने इंदिरा चौकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होते.

इतक्यात समोरून भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रिक्षाचालकाने जखमीला मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्यावरील पादचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत जखमी गोपाळ मांडवे यांना उचलून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मांडवे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून डोळ्यालाही मार लागला आहे. याप्रकरणी फरार रिक्षा चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे जखमी पोलीस गोपाळ मांडवे यांनी सांगितले. विशेष म्हणजे संबंधित रिक्षाचा क्रमांक सापडला असून त्याद्वारे फरार रिक्षावाल्याचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच हा रिक्षावाला गजाआड असेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

रात्रीच्या सुमारास रिक्षावाले तर्राट 

रात्रीच्या सुमारास कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांची मोठी गर्दी आणि धावपळ असते. त्यातच बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या वाढली असून अधिक फेऱ्या मारण्याच्या नादात ते पादचाऱ्यांच्या आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा विचार न करता भरधाव वेगात रिक्षा चालवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. रात्रीच्या वेळी तर अनेक रिक्षा चालक मद्यपान करून रिक्षा चालवत असल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी रात्रीच्या सुमारास विशेष मोहीम राबवून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news