Dombivli Crime : डोंबिवलीकर आजीबाईंना ‘लिव्ह इन’ची हौस पडली महागात, ५७ लाख हडपून भामट्याने बँक खाते केले रिकामे

मॅट्रिमोनियल साईटवरून एकट्या महिलांना लुटणारा आंतरराज्यीय भामटा पोलिसांच्या जाळ्यात.
dombivli crime
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रलोभन दाखवून एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ५७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर ओळख करून विश्वास संपादन करणाऱ्या एका आंतरराज्यीय भामट्याच्या विष्णूनगर पोलिसांनी दिल्लीतून मोठ्या महत्प्रयासाने मुसक्या आवळल्या आहेत. भामट्याने केलेल्या या फसवणुकीमुळे पीडित आजींवर थेट वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली असून, या आजींप्रमाणेच त्याने देशभरातील अनेक महिलांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

अनुज संतोष तिवारी उर्फ अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी उर्फ अनुजसिंग संतोष सिंग अग्रवाल (वय ४८) असे वेगवेगळी नावे धारण करून अडल्या-नडल्या महिलांची फसवणूक करणाऱ्या बदमाशाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डोंबिवलीत राहणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेने आयुष्याच्या उत्तरार्धात सोबती मिळावा यासाठी एका मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर नाव नोंदविले होते. तिथे त्यांची ओळख अनुज संतोष तिवारी याच्याशी झाली. त्याने आजींशी गोड बोलून जवळीक साधली आणि त्यांना एकत्र राहण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर विविध घरगुती आणि वैद्यकीय कारणे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने आजींकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ५७ लाख रुपये उकळले. संपूर्ण पैसे हाती लागताच त्याने आजींशी असलेला सर्व संपर्क तोडून टाकला. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर आजींना मोठा धक्का बसला.

पीडित आजींवर वृद्धाश्रमात राहण्याची आली वेळ

या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे पीडित आजींची आयुष्यभराची सर्व जमापुंजी संपुष्टात आली आहे. अचानक झालेल्या या आर्थिक आघातामुळे आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन न उरल्याने आजींवर आता थेट वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आजी राहत असलेल्या परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भामट्याच्या दिल्लीतून आवळल्या मुसक्या

या संदर्भात आजींनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधले असता तो दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विष्णूनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने दिल्लीत जाऊन आरोपी अनुज तिवारी याला बेड्या ठोकल्या. मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा राहणारा असलेला हा बदमाश प्रत्येक वेळी वेगवेगळी नावे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

देशभरातील महिलांना गंडविल्याचा पोलिसांना संशय

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या भामट्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मॅट्रिमोनियल साईट्सवर एकट्या राहणाऱ्या किंवा सोबतीच्या शोधात असलेल्या महिलांना लक्ष्य करणे हा त्याचा मुख्य गोरखधंदा होता. त्याने आतापर्यंत एकूण किती महिलांना आणि किती रुपयांचा गंडा घातला आहे, याचा अचूक आकडा शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. हा बदमाश सध्या पोलीस कोठडीत असून विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या आरोपीने किंवा अशा प्रकारे इतर कोणत्याही व्यक्तीने मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून कोणाची फसवणूक केली असेल, तर पीडित महिलांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन विष्णूनगर पोलिसांनी केले आहे.

बदमाशाची धक्कादायक कार्यपद्धती आणि पोलिसांचा सल्ला

हा आरोपी मॅट्रिमोनियल डॉट कॉम, शादी डॉट कॉम आणि साथी ॲप सारख्या संकेतस्थळांवर जाहिराती देऊन विधवा, निराधार किंवा ज्यांची मुले परदेशात नोकरीला आहेत अशा एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांना शोधायचा. संपर्कासाठी तो नेहमी दुसऱ्याच्या नावाने घेतलेले सिम कार्ड वापरायचा आणि वेगवेगळी नावे सांगून आपली खरी ओळख लपवायचा. महिलांशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो त्यांच्या घरात ये-जा सुरू करायचा आणि पुढे सोन्याचे दागिने चोरणे, घर विकण्यास लावून पैसे लुबाडणे आणि कर्जाच्या नावाखाली मालमत्ता हडपणे असे गंभीर प्रकार करायचा.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मॅट्रिमोनियल साईट ॲपवर ओळख झालेल्या व्यक्तीला लगेच वैयक्तिक माहिती, आर्थिक तपशील किंवा घराची चावी देऊ नये. अनोळखी व्यक्तीसोबत कोणताही आर्थिक व्यवहार करताना कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच, दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेणे किंवा देणे हा कायद्याने गुन्हा असून अशा सिमवरून आलेल्या संशयास्पद फोनला प्रतिसाद देऊ नये. घर, सोने किंवा इतर मौल्यवान वस्तू विक्रीसाठी कोणी दबाव आणत असेल, तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news