Pothole accident : खड्ड्यांमुळे अपघात, डॉक्टरचा बळी
भिवंडी : शहरातील वंजारपट्टी नाका परिसरातील सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ.मोहम्मद नसीम अमीनुद्दीन अन्सारी (वय 58) असे मृत डॉक्टरांचे नाव आहे.
डॉ.नसीम अन्सारी हे रात्री ढाब्यावर जेवण करून 12.20 वाजताच्या सुमारास अॅक्टिवाने नागाव येथील घरी परतत होते. त्यावेळी सिराज हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील काँक्रिट रस्ता व डांबरी रस्ता यामध्ये पडलेल्या भेगमुळे तयार झालेल्या खड्ड्यां मध्ये त्यांच्या बाईकचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्याच वेळी तेथून जाणार्या ट्रकच्या मागील चाखाखाली आल्यामुळे ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी काहीकाळ रस्ता रोखून धरला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डागळे हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी हस्तक्षेप करून नागरिकांना शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रात्री उशिरा निजामपूर पोलीस ठाण्यात ट्रक (जी जे 15 ए टी 0506) चालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम या विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वर्दळ वाहतूक पोलिसांनी तत्काळ थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान सकाळी स्थानिक नागरिकांनी या खड्ड्यात खडी टाकून रस्ता बुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार रईस शेख यांनी शनिवारी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची शिष्टमंडळासह भेट घेत या अपघातास महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकार्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत पालिका उपायुक्त विक्रम दराडे यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
टास्क फोर्स नेमा
भिवंडीतील रस्त्यांची स्थिती इतकी वाईट आहे. खराब रस्त्यामुळे भिवंडीतील अनेक बहुउद्देशीय कंपन्या त्यांची कार्यालये स्थलांतर करण्याचा विचारात आहेत. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात ज्येष्ठ अभियंत्याच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स नेमण्यात यावा तसेच खड्ड्यांमुळे अपघातामध्ये जीव गमावलेले डॉ. नसीम अन्सारी यांच्या वारसांना 25 लाखांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासदंर्भात पत्र लिहिले आहे.

